‘सुवर्णदुर्ग’ किल्ल्याने घेतला मोकळा श्वास
शिवशंभू ऐतिहासिक ग्रुपचा पुढाकार; विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १५ ः ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘शिवशंभू ऐतिहासिक ग्रुप’च्यावतीने दापोलीतील जलदुर्ग सुवर्णदुर्ग किल्ल्यावर राबवण्यात आलेली संवर्धन मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. या मोहिमेत शिवप्रेमींसह शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता केली.
मराठा आरमाराचे मुख्य केंद्र असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर ही मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील बुरूज, विहिरी, चोरदरवाजा आणि इतर महत्त्वाच्या अवशेषांच्या परिसरातील वाढलेली झाडेझुडपे आणि कचरा काढून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेमुळे किल्ल्यातील अनेक दुर्लक्षित वास्तू आता पुन्हा स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, या साफसफाईदरम्यान काही नवीन ऐतिहासिक अवशेषही प्रकाशात आले आहेत.
मोहीम क्र. ४ मध्ये आंजर्ले येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि वेळवी हायस्कूलच्या स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने श्रमदान केले. या मोहिमेचे नेतृत्व संस्थेच्या अध्यक्ष सुचिता सावंत, कोषाध्यक्ष संदेश महाडिक आणि सचिव चिन्मय गुरव यांनी केले. या मोहिमेत रूद्र पवार, कुणाल दहिवलकर, यश वायंगणकर यांसह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शिवप्रेमी सहभागी झाले होते. दरम्यान, मोहिमेत किल्ल्याच्या पूर्वेकडील गुप्त चोरदरवाजा शोधून त्याची स्वच्छता करण्यात आली. २८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मोहिमेत किल्ल्याच्या पायऱ्या आणि अंतर्गत वास्तूंची साफसफाई करण्यात आली होती. तसेच अनिकेत पोवाडा यांनी आपल्या वक्तृत्व आणि लेखणीच्या माध्यमातून या कार्याला प्रसिद्धी दिली. खेड तालुका खजिनदार वैभव सागवेकर यांनी ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने केले आहे.
-------
कोट
येत्या काळात आंजर्ले परिसरातील विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिक या चळवळीत मोठ्या प्रमाणावर जोडले जातील. सुवर्णदुर्गाच्या संवर्धनाची ही मोहीम भविष्यात अधिक व्यापक केली जाईल.
- संदेश महाडिक व चिन्मय गुरव (शिवशंभू ग्रुप)