वयोवृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
esakal January 16, 2026 08:45 AM

वयोवृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
ठाणे, ता. १५ : शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आता चोरट्यांनी चक्क अंगावर दुचाकी घालून वृद्ध महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना वाघबीळ परिसरात घडली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात महिलांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. डोंगरीपाडा येथील किंगकाँगनगर भागात राहणाऱ्या मंगल गायकवाड (६३) या मंगळवारी (ता. १३) सकाळी नेहमीप्रमाणे घरकामासाठी वाघबीळकडे पायी निघाल्या होत्या. सकाळी त्या वाघबीळ येथील एका चहाच्या टपरीजवळ पोहोचल्या असता समोरून एका दुचाकीवर दोन तरुण आले. चोरट्यांनी आपले तोंड रुमालाने बांधले होते. गायकवाड यांना थांबवण्यासाठी चोरट्यांनी थेट त्यांच्या अंगावर दुचाकी घातली. त्या काही समजण्याच्या आतच, दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसकावले आणि वेगाने पळ काढला. या झटापटीत चोरट्यांनी ५० हजार रुपये किमतीचे दागिने लांबवले आहेत. याप्रकरणी मंगल गायकवाड यांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.