टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा 18 जानेवारीला इंदूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर उभयसंघात 21 ते 31 जानेवारी दरम्यान एकूण 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका निर्णायक अशी असणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियात अचानक 2 बदल करण्यात आले आहेत.
भारताचा मिडल ऑर्डरमधील फलंदाज तिलक वर्मा याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या 3 सामन्यांतून बाहेर व्हावं लागलं होतं. तर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतूनच माघार घ्यावी लागली. त्यामुळे भारताला मोठा झटका लागला होता. तसेच तिलक आणि सुंदरच्या जागी संघात कुणाला संधी मिळणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना लागून होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.
बीसीसीआयने तिलक वर्मा याच्या जागी न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याचा संघात समावेश केला आहे. श्रेयसला पहिल्या 3 सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. श्रेयसचं यासह तब्बल 2 वर्षांनंतर टी 20i संघात पुनरागमन झालं आहे. तर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी फिरकीपटू रवी बिश्नोई याला संधी मिळाली आहे.
श्रेयस अय्यर याने डिसेंबर 2023 मध्ये अखेरचा टी 20i सामना खेळला होता. तर रवी बिश्नोई याचा फेब्रुवारी 2025 पासून एकदाही प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. मात्र आता दोघांचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे या दोघांसाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा पाहता ही मालिका निर्णायक ठरणार आहे.
तिलक-सुंदरला काय झालंय?
वॉशिंग्टन सुंदर याला 11 जानेवारीला न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या वनडेत बडोद्यात बॉलिंग करताना दुखापत झाली. सुंदरला या दुखापतीमुळे अचानक त्रास जाणवू लागला. आवश्यक उपचारानंतर सुंदरला विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. त्यामुळे सुंदरला या मालिकेला मुकावं लागलंय.
तसेच तिलक वर्मा याला विजय हजारे ट्रॉफी दरम्यान त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिलकवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तिलकला टी 20i मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये खेळता येणार नसल्याचं बीसीसीआयने 8 जानेवारीला जाहीर केलं होतं.
न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (पहिल्या 3 सामन्यांसाठी), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (विकेटकीपर) आणि रवी बिश्नोई.