‘अवयवदान’ हे जगातील सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. कारण ते मृत्युनंतरही आपण करू शकतो. अवयवदानामुळे पुण्य तर मिळतेच शिवाय दुसऱ्याला आयुष्यही मिळतं. त्यातही जर तुम्ही नेत्रदान करत असाल तर एखादा व्यक्ती तुमच्या डोळ्यांनी न पाहिलेलं जग पाहतो. पण, नेत्रदान करण्याविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. त्यातील एक म्हणजे नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो? या प्रश्नावर “द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन” चे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक पुरुषोत्तम पवार योग्य मार्गदर्शन केले आहे.
संस्थापक पुरुषोत्तम पवार सांगतात की, नेत्रदानानंतर चेहरा विद्रुप होतो का? हा सर्वांना पडणारा प्रश्न आहे. याचे उत्तर देताना ते म्हणतात की, “कायम असं म्हटलं जातं की, मी डोळे दान केले. त्यामुळे सर्वांना असंच वाटतं की पूर्णपणे डोळा काढून दान केला. ही संकल्पना स्पष्ट करताना ते पुढे सांगतात की, पूर्वी नेत्रदान करताना संपूर्ण नेत्रगोल काढला जायचा आणि त्यानंतर त्यातील कॉर्नियाचा भाग वेगळा करून वापरला जायचा. उरलेला नेत्रगोलाचा भाग डोळ्यांचा अभ्यास करणारी मंडळी रिसर्चसाठी वापरायची. पण आता काळ पुढे गेलाय, विज्ञान तंत्रज्ञान प्रगत झालं आहे. आता फक्त गरज असणारा भाग कट करून वापरला जातो. ”
डोळ्याच्या रचनेविषयी सांगताना पुरुषोत्तम पवार सांगतात की, “डोळ्याचा काळा भाग असतो तो काळा नसून त्यातील आतील भाग काळा आहे. त्यावर एक काच आहे. जशी घड्याळ्यात असते त्याचप्रमाणे..”
“बऱ्याच महिला डोळे सुंदर दिसण्यासाठी हिरव्या, निळ्या, सिल्वर अशा विविध रंगाच्या लेन्स वापरतात. जशी ही काच असते त्याचप्रमाणे डोळ्याच्या काळ्या पटलावरील ही काच आहे, जी डोळ्यांच्या रचनेत देवाने बनवलेली आहे, जी काढता येत नाही, फक्त एकदाच काढू शकता जेव्हा नेत्रदान करायचे असते तेव्हा..”
नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो का?
नेत्रदानानंतर चेहरा विद्रुप होतो का? याचे उत्तर देताना पुरुषोत्तम पवार सांगतात की, “नेत्रदानानंतर चेहरा विद्रुप होतो. त्यामुळे आम्ही मेल्यावर नेत्रदान करणार असं बरेच लोक भितीने म्हणतात. पण नेत्रदान म्हणजे नेत्रपटल ज्याला इंग्लिशमध्ये ‘कॉर्निया’ असं म्हटलं जातं तो कॉर्निया काढल्यानंतर नंतर त्या ठिकाणी एक काच म्हणजे तशाच प्रकारचा कॉर्निया त्या ठिकाणी बसवला जातो. पापणी बंद केली जाते चेहरा विद्रूप होत नाही.” असं ते सांगतात.
हेही वाचा – Bajri Bhakar Benefits: दररोज बाजरीची भाकर खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या