वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी बुधवारी रात्री उशिरा इराणमधील हिंसाचार आणि तणावग्रस्त परिस्थितीबद्दल दूरध्वनीवरून चर्चा केली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या संभाषणाची माहिती ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली. ‘मला इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांचा फोन आला. आम्ही इराणमधील आणि आसपासच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली.’ असे ट्विट त्यांनी केले आहे. इराणमधील हिंसाचार वाढल्यानंतर तेथील भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिशानिर्देश जारी केल्यानंतर ही चर्चा झाली आहे. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी पुढील सूचना येईपर्यंत इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचा प्रवास काटेकोरपणे टाळावा असे सांगितले आहे. तसेच सध्या इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांना सुखरुपपणे मायदेशी परतण्यासाठी पूर्णपणे सज्जता बाळगण्याचे निर्देश जारी केले आहेत.