भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या आणि निर्णायक सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी गमावली. न्यूझीलंड राजकोटमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयी धावांचा पाठलाग करुन सामना जिंकणारी पहिली टीम ठरली. न्यूझीलंडने यासह पहिल्या पराभवाची परतफेड करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशा फरकाने बरोबरी केली. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक होणार आहे. या सामन्यात भारताची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना काही विक्रम करण्याची संधी आहे. ते विक्रम काय आहेत? त्यासाठी रोकोला काय करावं लागेल? हे सविस्तर जाणून घेऊयात. तिसरा सामना हा रविवारी 18 जानेवारीला इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे.
रोहित नववर्षातील पहिल्या एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत धमाका करण्यात अपयशी ठरलाय. रोहितला दोन्ही सामन्यात सुरुवात चांगली मिळाली. मात्र रोहितला मोठी खेळी करता आली नाही. तर विराटने पहिल्या सामन्यात 93 धावा करुन भारताला विजयी करण्यात प्रमुख योगदान दिलं. मात्र विराटला दुसर्या सामन्यात काही करता आलं नाही. त्यामुळे रोहित आणि विराटकडून मालिकेतील शेवटच्या सामन्यात मोठ्या खेळीची आशा आहे. विराटने याच मैदानात न्यूझीलंड विरुद्ध 2023 मध्ये शतक केलं होतं. त्यामुळे विराटच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
विराटने गेल्या सामन्यात छोट्या खेळीसह सचिनचा न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला होता. त्यानंतर आता रोहितला न्यूझीलंड विरुद्ध भारताकडून एकदिवसीय धावांबाबत वीरेंद्र सेहवागला पछाडण्याची संधी आहे. रोहितला सेहवागला मागे टाकण्यासाठी फक्त 35 धावांची गरज आहे.
रोहितकडे दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर जॅक कॅलिस याला एकदिवसीय धावांबाबत मागे टाकण्याची संधी आहे. कॅलिस 11 हजार 579 धावांसह आठव्या स्थानी आहे. तर रोहितच्या नावावर 11 हजार 566 धावा आहेत. रोहितला आता 14 धावांची गरज आहे.
विराट कोहली याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर न्यूझीलंड विरुद्ध भारताकडून सर्वाधिक शतकांचा विक्रम हा संयुक्तरित्या सेहवाग आणि विराटच्या नावावर आहे. त्यामुळे इंदूरमध्ये शतक केल्यास विराट न्यूझीलंड विरुद्ध भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय शतकं करणारा फलंदाज ठरेल.