Getty Images काँग्रेसचे मुंबईतले नेते अमिन पटेल, वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख
महाराष्ट्रात 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतदान झाले. आज 16 जानेवारीला त्याचे निकाल जाहीर होत आहेत.
आतापर्यंतच्या कलांनुसार आणि जाहीर झालेल्या विजयांनुसार महाराष्ट्रात सर्वत्र भाजपा, त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मजल मारलेली दिसते. त्यातही भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीचा फॉर्म्युला यशस्वी झाल्याचं दिसत आहे.
अजून निकाल पूर्ण जाहीर झाले नसली तरी एकूण चित्र स्पष्ट झालेलं आहे.
राष्ट्रवादी काँँग्रेसचा विचार करता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपानं आघाडी घेतल्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या या दोन पालिकांचे 'पालक' म्हणवले जाणाऱ्या अजित पवार यांना मोठा फटका बसल्याचं दिसतं.
मुंबईत भाजपाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही महायुतीचा महापौर होणार हे आता स्पष्ट झालं आहे.
पण या निवडणुकीत सर्वात मोठा फटका काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला बसल्याचं दिसतं. एकेकाळी विविध पालिकांमध्ये सत्ता आणि तिजोरीच्या किल्ल्या ज्या पक्षांकडे होत्या, त्या पक्षाचं पुरतं पानिपत झाल्याचं दिसत आहे.
बहुतांश पालिकांमध्ये आघाड्या आणि युतीचं राजकारण आता अटळ आहे. अनेक खंडात, गटात विभागलेलं राजकीय अवकाश जोडत सत्ता मिळवण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळेच निवडणूकपूर्व आघाड्यांना महत्त्व येतं. कोण कोणाशी कधी हातमिळवणी करतंय यावर निकाल ठरतो.
केवळ हातमिळवणी होऊन उपयोग नाही तर वास्तव जमिनीवर तसं काम होणं आवश्यक असतं.
'दक्ष' महायुतीया निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्या युतीमध्ये अनेकदा बेदिली दिसून आली.
ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई इथं दोन्ही गटांतील नेत्यांनी एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेतलं. पण एका मर्यादेपलिकडे हे जाणार नाही, याकडे 'कोणीतरी' वरिष्ठ लक्ष ठेवून असावं.
या समजूतदारपणाचा फायदा भाजपाला मोठ्या प्रमाणात झाला हे निर्विवाद. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, सोलापूर इथं भाजपाला मोठं यश मिळालं आहे. पाठोपाठ शिंदे गटाला त्यांच्या आकारानुसार फायदा झाला आहे.
Getty Images एकीकडे मुंबईत अमित साटम, कल्याण-डोंबिवली-ठाण्यात रवींद्र चव्हाण आणि राज्यभरात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची बाजू लावून धरली.
मात्र, ही समज इतर आघाड्यांमध्ये दिसली नाही असं आता निकालातून स्पष्ट दिसत आहे.
महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र आली. त्या दोघांनी मराठीचा मुद्दा हा एकमेव केंद्रबिंदू ठेवून वाटाघाटी, तिकीट वाटप, प्रचार सुरू केला. त्यात त्यांना अपेक्षित असं यश आलं नसलं तरी फायदा नक्कीच झाला.
मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा वातावरण निर्मितीसाठी त्यांनी नक्कीच तापवला असं म्हणावं लागेल. परंतु, या नादात इंडी आघाडीचं आपोआप विसर्जन झालं.
परप्रांतियांना मुंबईत घुसू देणार नाही, अशी ठाम आणि उघड भूमिका घेणाऱ्या मनसेबरोबर काँग्रेस एकत्र आघाडीत राहाणं शक्य नव्हतं. किंवा आघाड्या ठरवताना या पर्यायांचा विचारच उरला नाही.
आहे एकत्र तरी...मुंबईत दोन्ही भाऊ परस्पर एकत्र आल्यावर काँग्रेसला बाहेर पडण्यापासून पर्याय राहिला नाही. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेबरोबर निवडणुकीत हातमिळवणी अशक्य असल्याची स्पष्ट भूमिका घेतली. या एकट्या पडलेल्या काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीची साथ घ्यायचं ठरवलं.
या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला खरा. पण मुंबईत त्यांचं काय होणार? याचे संकेत मतदानाआधीच दिसू लागले. जागावाटपामध्ये वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसकडून 62 जागा मागून घेतल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या दिल्याही. मात्र, त्यातल्या 16 जागांवर वंचितनं अर्जच भरले नाहीत.
Getty Images वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
एकीकडे एकेक जागेसाठी आघाड्यांमध्ये भांडणं, वादविवाद होतात कधी त्या तुटेपर्यंत ताणतात. पण जागावाटप होऊन एका भागीदार पक्षानं इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवारच न देणं हे फार दुर्मिळ आहे. या एका मोठ्या उदाहरणावरुनच दोन्ही पक्षांचं मुंबईत किती सख्य आहे आणि ते मतात किती उतरेल याचा अंदाज येतो. आणि झालंही तसंच.
वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या जागांवर चुकीचे उमेदवार आले असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि चुकीचे उमेदवार देऊन आम्हाला वेगळा पायंडा पाडायचा नव्हता अशा शब्दांत वंचितची बाजू मांडली होती. मात्र तरिही या आघाडीत अकृत्रिम भाव नाही हे स्पष्ट झालं होतं.
Getty Images काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
पुढे प्रचारामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे मुंबईतले नेते प्रत्यक्ष कामात एकत्र येऊन हिरिरीनं प्रचार करत आहेत असं दिसलं नाही. त्यामुळेच की काय निकाल लागण्याच्या आधीच सिद्धार्थ मोकळे यांनी काँग्रेसला 'आपण आघाडीत एकत्र लढलो की स्वतंत्र याचं स्पष्टीकरण द्या' असं विचारलं.
"मतांचं आवाहन करताना काँग्रेसचे नेते व्हीडिओत वंचितचा उल्लेख करत नाहीत," असा त्यांनी आरोप केला. त्याला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तरही दिलं. "वंचितचा काहीतरी गैरसमज झाला. आम्ही त्यांच्या उमेदवारांनाही विजयी करण्याचं आवाहन केलं होतं", असं उत्तर दिलं.
या सगळ्यात एकेकाळी मुंबईत महापौरपदी आपला उमेदवार बसवणारी काँग्रेस आता नव्या सभागृहात अधिकच आकुंचित होत जाईल हे दिसलं. मुंबईमध्ये काँग्रेसला साधारणपणे 13 जागा मिळतील, असं दिसत आहे.
भाजपासारखं निवडणूक नावाचं सतत धडधडतं इंजिन नसणं, केंद्रातल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाचा अभाव, एकाकी धडपड करणारे प्रदेशाध्यक्ष अशी अनेक कारणं काँग्रेसच्या स्थितीमागे आहेत.
लातूरची गढी जिंकलीच!या निकालांमध्ये काँग्रेसला सर्वात स्वच्छपणे सांगता येईल, असं यश मिळालंय ते मराठवाड्यातल्या लातूरमध्ये. इथं काँग्रेसनं अगदी स्पष्ट विजय मिळवला असून देशमुख कुटुंबापुढे भाजपाचे प्रयत्न स्पष्टपणे निष्प्रभ ठरले आहेत. 70 मधल्या 47 जागांवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला यश मिळालं आहे. भाजपाला फक्त 22 जागांवर समाधान मानावं लागणार आहे.
Amit V. Deshmukh अमित देशमुख
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या वक्तव्याचा परिणामही या निकालावर झाला असणार यात शंका नाही. चव्हाण यांनी नंतर माफी मागितली असली तरी या चुकीचा फटका सहन करावा लागणार तसेच ते दीर्घकाळ माध्यमात, प्रचारात राहाणार.
तुम्ही म्हणशिला तसं...काँग्रेसला चांगलं यश मिळेल, असा भरवसा आणखी एका महानगरपालिकेपुरता वाटत होता, तो म्हणजे कोल्हापुरपुरता.
कोल्हापूरमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील आपली सगळी ताकद लावतील यात कोणालाही शंका नव्हती. तशी त्यांनी ती लावलीही पण तरिही काँग्रेसला एकहाती किंवा निर्भेळ म्हणावं असं यश आलेलं नाही.
या निवडणुकीत काँग्रेसला 34, उबाठा गटाला-1, भाजपाला 26, शिंदेगटाला 14, अजित पवार यांच्या गटाला 4 तर जनसुराज्यलाही एका जागी यश मिळत असल्याचं आतापर्यंतच्या निकालातून दिसतं.
इथं काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांना बरोबर घेतलं पण त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच झालेला दिसतो.
यासाठी एक उदाहरण पाहाता येईल, ते काँग्रेसचे जुने नेते विक्रम जरग यांचा मुलगा अक्षय याचं. विक्रम जरग यांना आपल्या मुलाला तिकीट मिळावं अशी अपेक्षा होती मात्र ती जागा शिवसेनेला गेल्यामुळे त्याचा निरुपाय झाला.
Satej D. Patil सतेज पाटील
अक्षय जरग यांनी जनसुराज्य पक्षातून अर्ज भरुन निवडणूक जिंकलीही आणि शिवसेना उमेदवाराचा पराभव केला. असाच काहीसा प्रकार शारंगधर देशमुख यांच्याबाबतीत झाला.
काँग्रेसचे स्थानिक प्रभावी नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारंगधर देशमुखांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ते निवडूनही आलेत. आपली ताकद असतानाही कोल्हापुरातल्या या चुकांचा फटका काँग्रेसच्या एकूण जागांवर होणार हे आता स्पष्ट दिसत आहे.
भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्या युतीला लोकसभेत पराभव पत्करावा लागला. कोल्हापूरची जनता शाहू महाराज छत्रपती यांच्यामागे उभे राहिली आणि त्यांना लोकसभेत जाता आलं. याचा परिणाम लगेचच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत होईल असं वाटत होतं.
मात्र तसं झालं नाही. ऐनवेळी मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेण्याने सतेज पाटील यांना चांगलंच तोंडघशी पडल्यासारखं झालं. अशा गोष्टींचा परिणाम निकालात झाला आणि काँग्रेसला पूर्ण जिल्ह्यात एकही जागा मिळवता आली नाही. आता सतेज पाटील पुन्हा आपली पकड सिद्ध करतील असं वाटलं होतं तरीही ते एकाकीच पडले असं वाटतं.
Satej D. Patil सतेज पाटील
शहरात सर्वत्र जोरदार प्रचार करणं, 'कोल्हापूरकर कसं? तुम्ही म्हणशिला तसं...' अशा टॅगलाइननी त्यांनी प्रचारात रंगत आणली आणि तशी मेहनतही घेतली तरीही ते एकटेच राहिले असं निकालात दिसून येतं.
दुसरा मुद्दा राहातो तो सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबातील प्राचीन विरोधाचा. महाडिक कुटुंबातील धनंजय महाडिक यांनी भाजपासाठी कंबर कसली होती. धनंजय महाडिक यांना राज्यसभेत पाठवताना महाराष्ट्र विधिमंडळात ऐतिहासिकच म्हणावी अशी मतदान प्रक्रिया आणि निवडणूक झाली होती.
सतत काही वर्षं पराभव पाहाणाऱ्या महाडिकांनी यानंतर मात्र जोरदार मुसंडी मारली. अमल महाडिक यांनी विधानसभेत ऋतुराज पाटील यांचा पराभव केला.
Rajesh Kshirsagar देवेंद्र फडणवीस कोल्हापूरमध्ये
आताही महानगरपालिका निवडणुकीत धनंजय यांचे पुत्र कृष्णराज इच्छुक होते. मात्र आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट देऊ नये अशी भूमिका पक्षानं घेतल्यावर त्यांनी माघार घेतली. हे झालं तरी शहरातल्या राजकारणात तरुण तुर्कांची लाट आलीय याचे संकेत द्यायला ते विसरले नाहीत.
प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणं अशा उपायांनी ते चर्चेत राहिले. या सर्व गोष्टी भाजपाच्या पथ्यावर पडल्या.
दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षिरसागर विजयी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या सतेज पाटील यांना बाजूला करण्यात महाडिक, क्षिरसागर यांना यश आलं आहे.
'ब्लॅक गोल्ड' चमकलंराज्यभरात बऱ्यापैकी आपटी खाल्ली असली तरी काँग्रेसला विदर्भात एकेठिकाणी यश मिळालं आहे. ते म्हणजे 'ब्लॅक गोल्ड सिटी' नावानं ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरमध्ये.
चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे 23 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्या जनविकास या मित्रपक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत. तर उबाठा गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. भाजपाला 21 जागांवर थांबवण्यात काँग्रेसला यश आलं आहे. बाकी एमआयएम, बसपा, वंचित बहुजन आघाडी, शिंदे सेना यांना प्रत्येक एक तर दोन अपक्षांना सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रयत्नांबरोबर भाजपातली अंतर्गत दुफळीही यासाठी कारणीभूत मानली जाते. किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या उघड कलहामुळे भाजपातला वाद उघड झाला होता. त्याचाही परिणाम या निकालांवर झालाच असेल.
आता महाराष्ट्रात 'पतंग' नवखा नाहीमहाराष्ट्रात एमआयएम म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाचं नाव आता काही नवं राहिलेलं नाही. सुरुवातीला मराठवाड्यातील काही जागांवर चंचुप्रवेश केलेल्या या पक्षानं 2014 साली सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
भायखळ्यात वारिस पठाण आणि (तेव्हाच्या) औरंगाबाद मध्य मतदारसंघात इम्तियाज जलिल निवडून विधानसभेत गेले.
2019 साली विधिमंडळाची टर्म पूर्ण होण्याआधीच जलील औरंगाबादचे (तेव्हाचे) खासदारही झाले. त्याआधी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आघाडीही केली होती. त्यामुळे हा पक्ष काही नवा राहिला नाही. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य आणि धुळे शहर मतदारसंघात या पक्षाचे उमेदवार निवडून आले.
Getty Images एकेकाळी हे दोन नेते एकत्र आले होते. 'यथावकाश' पतंगानं महाराष्ट्रात स्वतंत्र भरारी घ्यायला सुरुवात केली.
2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांचा पराभव झाला. तर मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माइल खालिक यांना निसटत्या मतांनी विजय पत्करुन विधानसभेत जाता आलं.
आता एमआयएमनं महानगरपालिका निवडणुकांत अमरावती महानगरपालिकेत 9, मुंबईत 4, छत्रपती संभाजीनगर पालिकेत 15, जालन्यात 2, परभणीत 1, सोलापूरमध्ये 8, अकोल्यात 3,ठाण्यात 5 जागांवर यश मिळवलं आहे. पूर्ण निकाल हाती आल्यावर यात आणखी बदल झालेले दिसतील.
मुंबईत समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक या दोन महत्त्वाच्या मुस्लीम नेत्यांच्या उपस्थितीतही एमआयएमनं विजय मिळवला आहे. 4 जागांपैकी एक जागा मानखुर्द शिवाजीनगर तर एक जागा चेंबूर चीता कॅम्प इथली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)