मुंबई : महिला प्रीमियर लीग (डब्लूपीएल ) मधील गुजरात जायंट्स संघाच्या खेळाडूंनी धारावीला भेट दिली आणि तेथील क्रिकेट खेळणाऱ्या शालेय विद्यार्थिनी, महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांशी संवाद साधला. आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतील रहिवाशांची जिद्द, चिकाटी आणि स्वप्ने यांमधून खेळाडूंना प्रेरणा मिळाली. इंग्लंडची आंतरराष्ट्रीय खेळाडू डॅनी व्याट - हॉज तसेच भारतीय खेळाडू हॅप्पी कुमारी आणि शिवानी सिंग यांनी यावेळी स्थानिकांशी संवाद साधला.
क्रिकेट खेळणाऱ्या शालेय मुलींनी उपलब्ध असलेल्या कुठल्याही मोकळ्या जागेत सराव करणे, शिक्षण आणि खेळ यांचा समतोल साधणे, तसेच मर्यादित पायाभूत सुविधांमध्येही क्रिकेटपटू बनण्याची स्वप्ने जपण्याबाबत आपले अनुभव सांगितले. “क्रिकेटमुळे आम्हाला आत्मविश्वास मिळतो आणि उज्ज्वल भविष्यासाठी आशा निर्माण होते,” असे एका शालेय मुलीने सांगितले. महिला बचत गटांच्या सदस्यांनी उपजीविका, घरच्या जबाबदाऱ्या तसेच पुढील पिढ्यांसाठी आवश्यक सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांची गरज यासंबंधी मुद्दे मांडले.
या संवादावर प्रतिक्रिया देताना डॅनी व्याट-हॉज म्हणाली, “येथे पाहिलेली विदयार्थ्यांची आणि नागरिकांची जिद्द खूपच प्रेरणादायी आहे. विशेषतः तरुण मुलींमधील उत्साह आणि आत्मविश्वास उल्लेखनीय आहे. अडचणी खऱ्या आहेत, पण त्या पार करण्याचा त्यांचा विश्वासही तितकाच ठाम आहे. हा दृष्टिकोन कोणत्याही खेळाडूसाठी महत्त्वाचा असतो.”
हॅप्पी कुमारी यांनीही या भेटीमुळे आपण खूप प्रेरित झाल्याचे सांगितले. गुजरात जायंट्सच्या खेळाडूंनी धारावीतील पुनर्वापर, वस्त्रनिर्मिती आणि चर्म उद्योगांनाही भेट दिली. मर्यादित जागेतूनही उद्योग कसे टिकतात आणि विस्तारतात, याचे प्रात्यक्षिक लघु व मध्यम उद्योजकांनी दाखवून दिले.