18207
18208
सावंतवाडीचे रस्ते खोदकामांमुळे उद्ध्वस्त
धुळीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त; ठेकेदाराचे मनमानी काम, वाहतूक कोंडी वाढली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः शहरात सध्या गॅस पाईपलाईन तसेच नळपाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनची कामे एकाच वेळी सुरू असल्याने शहरातील बहुतांश रस्ते खोदून ठेवले आहेत. मात्र, ही कामे ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने सुरू असून, त्यावर प्रशासनाचे कोणतेही प्रभावी नियंत्रण दिसून येत नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी शहरात धुळीचे साम्राज्य, धोकादायक रस्ते व वारंवार वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले असून प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे ५७ कोटी रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर गॅस पाईपलाईनचे कामही समांतर सुरू आहे. या दोन्ही कामांसाठी शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर खोदाई केली आहे. मात्र, ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे, त्या ठिकाणी प्रशासनाची देखरेख नसल्याचे चित्र आहे. ठेकेदारांकडून ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन न करता अर्धवट व बेभरवशाचे काम केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. खोदलेल्या ठिकाणी माती रस्त्यावर पसरून राहणे, धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याचा वापर न करणे, अनेक ठिकाणी चर न बुजवणे, तसेच अर्धवट भरलेले चर रोलिंग न करता तसेच सोडल्याने रस्त्यावर गतिरोधकासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, अरुंद मार्गांवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह दुकानदार व व्यावसायिकांनाही सहन करावा लागत आहे. रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये धूळ शिरून साहित्याचे नुकसान होत आहे. या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे. पालिकेवर भाजपची सत्ता असतानाही सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. नियमानुसार काम सुरू असताना संबंधित ठिकाणी प्रशासनाचा कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असताना अनेकदा कोणीही उपस्थित नसल्याचेही निदर्शनास येत आहे.
दरम्यान, रस्ते बुजविताना पाण्याचा वापर करून योग्य प्रकारे रोलिंग करणे गरजेचे आहे, अन्यथा पावसाळ्यात हे रस्ते पुन्हा खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी या कामांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठेकेदारांकडून पद्धतशीर व नियमबद्ध काम करून घ्यावे, तसेच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----------------
कोट
नळपाणीपुरवठा योजना व गॅस पाईपलाईनच्या कामासाठी ठेकेदारांना जे नियम घालून दिले आहेत, त्यांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. संबंधित ठेकेदाराला याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. तरीही चुकीच्या पद्धतीने काम होत असल्यास त्याकडे लक्ष दिले जाईल. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने काम करून घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील.
- ॲड. अनिल निरवडेकर, उपनगराध्यक्ष