डॉक्टरचे अपहरण; उकळली १९ लाखांची खंडणी
esakal January 17, 2026 01:45 PM

उरुळी कांचन, ता.१६ : पूर्व हवेलीत एका डॉक्टरचे अपहरण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तब्बल १९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पाच अनोळखी व्यक्तींविरोधात उरुळी कांचन (ता. हवेली) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता.१०) ते सोमवारी (ता.१२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इनामदारवस्ती परिसरात घडली आहे. याबाबत पोलिसांनी शुक्रवारी (ता. १६) माहिती दिली. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी डॉक्टरांचे पुणे सोलापूर महामार्गावरील एका गावात स्वतःचे रुग्णालय आहे. शनिवारी रात्री सव्वादहा ते साडेदहा वाजता त्यांच्या मोटारीने प्रवासासाठी निघाले होते.यावेळी त्यांच्याबरोबर चालक व रुग्णालयातील एक मदतनीस सोबत होते. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती परिसरात आले असता पांढऱ्या रंगाच्या इर्टीगा मोटारीने आलेल्या पाच अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोटार अडवली. आरोपींनी तिघांचे अपहरण करून धारदार शस्त्राचा धाक दाखवत फिर्यादीला मारहाण केली. तसेच एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडाला चावाही घेतला. आरोपींनी फिर्यादी, त्यांचे सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देत २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अखेर आरोपींनी जबरदस्तीने १९ लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारून तिघांना ताब्यात ठेवले. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता. फिर्यादी डॉक्टर यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी विलंब केल्याने हा गुन्हा उशिरा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड विभाग बापूराव दडस, निरीक्षक सचिन वांगडे, साहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे व स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सिद्ध पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करीत आहेत. चार संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती कळते आहे; मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.