देवेंद्र फडणवीस दावोस भेट: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum WEF) वार्षिक परिषदेसाठी 5 दिवसीय दावोस (Davos) दौऱ्यावर रवाना होत असून ते रविवारी मध्यरात्री स्वित्झर्लंडकडे प्रस्थान करणार आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक (Investment in Maharashtra) आणण्यावर राज्य सरकारचा भर असणार आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्रातील काही प्रमुख उद्योजकही दावोसला जाणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या वार्षिक बैठकीत विविध देशांतील राजकीय नेते, उद्योगजगतातील दिग्गज आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत.
मागील वर्षी राज्य सरकारकडून तब्बल 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू (MoU) करण्यात आले होते. त्यापैकी जवळपास 72 टक्के एमओयू प्रत्यक्षात उतरले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. यंदा मात्र राज्य सरकारचे लक्ष्य 16 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करार करण्याचे आहे. त्यामुळे यंदा दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रात किती मोठी गुंतवणूक येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेचे प्रमुख आकर्षण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) असणार आहेत. ट्रम्प यांच्याकडून दावोसला सर्वात मोठे शिष्टमंडळ दाखल होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, भारतातील जवळपास 10 राज्यांचे मुख्यमंत्री यंदा दावोस दौऱ्यावर असणार आहेत. सध्याच्या भू-आर्थिक तणावांच्या (Geo-economic tensions) पार्श्वभूमीवर गुंतवणूक, जागतिक धोरणे आणि आंतरराष्ट्रीय निर्णयप्रक्रियेत भारताचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच व्यापार (Trade), तंत्रज्ञान (Technology), ऊर्जा (Energy) आणि पुरवठा साखळी (Supply Chain) क्षेत्रात भारताची भूमिका अधिक बळकट करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आणखी वाचा