भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. रविवारी 18 जानेवारीला मालिका विजेता ठरणार आहे. त्यानंतर 21 ते 31 जानेवारीदरम्यान उभयसंघात एकूण 5 टी 20I सामन्यांचा थरार रंगणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेला 5-0 ने लोळवल्यानंतर भारताची महिला ब्रिगेड आता डूब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात वेगवेगळ्या 5 संघांचं प्रतिनिधित्व करत आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान टी20I मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी 20I सामन्यांचा थरार रंगणार आहे. हरमनप्रीत कौर भारताचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडेच उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.
टी 20I मालिकेतून भारतीय संघात युवा खेळाडू श्रेयांका पाटील हीचं कमबॅक झालं आहे. श्रेयांकाला दुखापतीमुळे काही महिने टीम इंडियातून बाहेर रहावं लागलं होतं. मात्र आता तिची निवड करण्यात आली आहे. श्रेयांकाला हर्लिन देओल हीच्या जागी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताची ही युवा खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. श्रेयांका सध्या डब्ल्यूपीएल स्पर्धेत आरसीबीकडून खेळत आहे. तसेच भारती फुलमाळी हीचं 7 वर्षांनंतर पुनरागमन झालं आहे. भारतीने 2019 मध्ये शेवटचा टी 20i सामना खेळला होता.
भारत-ऑस्ट्रेलिया, पहिला सामना, 15 फेब्रुवारी, सिडनी क्रिकेट ग्राउंड.
भारत-ऑस्ट्रेलिया, दुसरा सामना, 19 फेब्रुवारी, मानुका ओव्हल.
भारत-ऑस्ट्रेलिया, तिसरा सामना, 21 फेब्रुवारी, एडलेड ओव्हल.
बीसीसीआयकडून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर
टी 20I सीरिजसाठी वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, भारती फुलमाली आणि श्रेयांका पाटील.