सानपाडा येथे मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा
नेरूळ, ता. १८ (बातमीदार) : सानपाडा येथे नवी मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने १६ वा मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा केमिस्ट भवन येथे उत्साहात पार पडला. २००६ पासून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानने गेल्या दोन दशकांपासून विवाह जुळवणी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. समाजात विवाहासाठी योग्य जोडीदार शोधण्याची अडचण तसेच घटस्फोटाचे वाढते प्रमाण ही गंभीर सामाजिक समस्या बनत असताना, अशा उपक्रमांची गरज अधिक जाणवू लागली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आजवर अनेक विवाह यशस्वीरीत्या जुळविण्यात आले असून, समाजाकडून या उपक्रमाला सातत्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित वधू-वर व पालकांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे सचिव सुनीलशेठ छाजेड, नगरसेवक सोमनाथ वास्कर, समाजसेवक भाऊ भापकर, तानाजी पाटील, डॉ. मंगेश आमले, किशोर डांगट, डिंपल ठाकूर, भावेश पाटील, डॉ. विद्या खंबाळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम आदींचा समावेश होता.
स्वागतपर भाषण संघाचे सहसचिव व ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष जालिंदर भोर यांनी तर आर्थिक अहवालावर खजिनदार विष्णुदास मुखेकर यांनी माहिती दिली.