अपर्णा प्रतीकला घटस्फोट देणार आहे.
Marathi January 20, 2026 03:25 PM

भाजप नेत्यावर केला घर तोडण्याचा आरोप : सोशल मीडियावर पोस्ट

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तरप्रदेशच्या राजकारणात सर्वात प्रभावशाली परिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलायम सिंह यादव यांच्या परिवारात खळबळ उडाली आहे. मुलायम सिंह यांच्या कनिष्ठ स्नूषा आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांच्या वैवाहिक जीवनावर संकट ओढवले आहे. अपर्णा आणि त्यांचे पती प्रतीक यादव यांचे नाते आता घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. प्रतीक यादव यांनी सोमवारी अपर्णा यांच्यावर अनेक आरोप करत विभक्त होण्याची घोषणा केली आहे. प्रतीक यांनी लवकरा लवकर घटस्फोट घेणार असल्याचे इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले. तसेच अपर्णा यादव यांच्यासोबतच्या छायाचित्रासह त्यांना स्वार्थी आणि परिवाराला तोडणारी महिला संबोधिले आहे.

जितक्या लवकर शक्य होईल तितके लवकर या स्वार्थी महिलेकडून घटस्फोट घेणार आहे. या महिलेने माझे कौटुंबिक नाते उद्ध्वस्त केले आहे. अपर्णा केवळ प्रसिद्ध आणि प्रभावशाली होऊ इच्छिते. सध्या मी अत्यंत खराब मानसिक स्थितीत असून अपर्णाला याची किंचितही पर्वा नाही, कारण ती केवळ स्वत:विषयी विचार करते असा दावा प्रतीक यांनी केला आहे.

तर अपर्णा यादव यांनी कुठलाच वाद नसून कुणीतरी प्रतीक यांचे अकौंट हॅक केले होते असा दावा केला आहे. प्रतीक हे रियल इस्टेट व्यवसायाशी संबंधित आहेत, तर अपर्णा या भाजपमध्ये कार्यरत आहेत.

प्रतीक यांचा आयडी हॅक झाला असल्याने ते पोस्टमध्ये बदल करू शकत नाहीत, लवकरात लवकर त्यांच्याकडून वक्तव्य जारी करण्यात येईल असे अपर्णा यादव यांच्याशी संबंधित लोकांकडून सोमवारी सांगण्यात आले.

परिवार तोडण्याचा आरोप

प्रतीक यादव आणि अपर्णा यांच्यात मागील काही काळापासून सर्वकाही सुरळीत नाही अशी चर्चा सुरू होती. प्रतीक यांनी अपर्णा यांच्यावर कौटुंबिक मर्यादांकडे दुर्लक्ष करणे आणि सैफई परिवाराच्या एकतेत फूट पाडण्यासारखे गंभीर आरोप केले आहेत. दीर्घकाळापर्यंत वाद चालल्यावर आता आता हे प्रकरण कायदेशीर विभक्त होण्याच्या दिशेने जात असल्याचे मानले जात आहे. परंतु अपर्णा यादव यांच्याकडून  या आरोपांवर कुठलीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

राजकीय अन् वैचारिक मतभेद

या वादाचे मूळ केवळ वैयक्तिक नसून राजकारणही असू शकतो. पूर्ण यादव परिवार समाजवादी विचारसरणीसोबत एकजूट आहे, तर अपर्णा या भाजपमध्ये सक्रीय आहेत. अलिकडेच सैफई येथे झालेल्या कौटुंबिक सोहळ्यात अपर्णा आणि प्रतीक यांना एकत्र पाहिले गेले होते.

कोण आहे अपर्णा यादव?

अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांच्या कनिष्ठ स्नूषा असून उत्तरप्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध चेहरा आहेत. राजकारणासह त्या एक प्रशिक्षित नृत्यांगना आणि सेमी-क्लासिकल गायिका देखील आहेत. त्यांनी लखनौच्या संगीत संस्थेतून शिक्षण पूर्ण केले आहे. सामाजिक कार्यांसाठी त्यांचे संयुक्त राष्ट्रसंघाकडून देखील कौतुक झाले आहे. इंग्लंडच्या मँचेस्टर विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारणात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण पेले आहे.

प्रतीक यादव कोण

प्रतीक हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू आहेत. प्रतीक नेहमीच राजकारणापासुन दूर राहिले आहेत. ते मुख्यत्वे व्यवसायात कार्यरत असून स्वत:ची हाय प्रोफाइल लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. प्रतीक आणि अपर्णा या दांपत्याला एक कन्या देखील आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.