AI-Based Cervical Cancer Prevention: गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी ए-आयचा वापर; टाटा रुग्णालयाचा पुढाकार
esakal January 21, 2026 08:45 PM

AI Healthcare Workshops India: गर्भाशय मुखाचा कर्करोग वेळेवर तपासणी, लसीकरण आणि योग्य उपचारांमुळे मोठ्या प्रमाणात टाळता येण्यासारखा असला तरी भारतात महिलांमधील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी तो एक ठरत आहे. यावर एक पाऊल पुढे टाकत टाटा रुग्णालयाने कृत्रिम बुद्धिमत्ता (ए-आय) चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कर्करोग प्रतिबंध आणि लवकर निदानावर लक्ष केंद्रित करणारी राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी मुंबईत पार पडली.

जानेवारी महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त नवी मुंबईतील टाटा मेमोरियल केंद्रांतर्गत प्रगत कर्करोग उपचार, संशोधन व शिक्षण केंद्र (अॅट्रेक) यांच्या वतीने १५ आणि १६ जानेवारीला दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गर्भाशय मुख कर्करोग तपासणीची मूलतत्त्वे, कोलपोस्कोपी तसेच पूर्व कर्करोग व्यवस्थापन या विषयांवर ही कार्यशाळा केंद्रित होती. कर्करोग साथीविज्ञान केंद्रातील अंमलबजावणी विज्ञान व वर्तन संशोधन विभागाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

'एआय'च्या वापराने कर्करोगाचे योग्य निदान आणि योग्य उपचार देण्यास मदत होईल. तसेच इतर प्रभावित क्षेत्रात असणाऱ्या रुग्णावर एआयच्या मदतीने स्क्रीनिंगदेखील करता येईल, असे ही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

या कार्यशाळेत स्त्रीरोगतज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, पदव्युत्तर प्रशिक्षणाथों डॉक्टर आणि संशोधक असे एकूण ३४ जण सहभागी झाले होते. देशातील दहा राज्यांमधून आलेल्या या सहभागीच्या माध्यमातून गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी बहुवैद्यकीय दृष्टिकोनातून सखोल चर्चा झाली. पुराव्यावर आधारित तपासणी पद्धती, निदान प्रक्रिया आणि उपचार व्यवस्थापन यावाबत सहभागींची क्षमता वाढवणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी भारतात करण्यात आलेल्या विविध संशोधन अभ्यासांचे निष्कर्ष, कोलपोस्कोपीची मूलभूत माहिती, गर्भाशय मुख पूर्व कर्करोगातील पेशी तपासणी तसेच मानवी पॅपिलोमा विषाणू लसीकरणाची सद्यस्थिती यावर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे कोलपोस्कोपी प्रक्रिया दाखविण्यात आली. तसेच दृष्टीआधारित तपासणी, विषाणू डीएनए तपासणी आणि स्वतः नमुना देण्याच्या पद्धतींचे सादरीकरण करण्यात आले. समारोप सत्रात अॅट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपचार पद्धती देशभर पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. तर अॅट्रिकचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत भाट यांनी तपासणीची उपलब्धता वाढवणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन आणि दर्जा नियंत्रण यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला.

उपचार पद्धतींचे प्रशिक्षण

तपासणीतील नव्या तत्रज्ञानाचा वापर करतानाच डिजिटल साधने, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग तसेच गर्भाशयमुख कर्करोगाच्या साथीविज्ञानातील बदलते प्रवाह यावर चर्चा करण्यात आली. तपासणीपासून उपचारांपर्यंतच्या प्रक्रियेवर आधारित प्रकरणांवर सखोल संवाद साधण्यात आला. उष्णतेद्वारे उपचार, गोठवून उपचार आणि शस्त्रक्रियेद्वारे उपचार या पद्धतींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण हे या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. तसेच दृष्टी आधारित तपासणी, विषाणू डीएनए तपासणी आणि स्वतः नमुना देण्याच्या पद्धतींचे सादरीकरण करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.