दौंड, ता. २१ : शहरात भरदुपारी महिलेच्या गळ्यातील एक लाख ४० हजार रुपये मूल्य असलेली सोनसाखळी हिसकाविण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी (ता. २१) दिली.
चित्रा नागेंद्र पिल्ले (रा. पंचगंगा अपार्टमेंट समोर, गोपाळवाडी रस्ता, दौंड) यांनी या बाबत फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी ( ता. १७) दुपारी चित्रा पिल्ले या रस्त्यावरून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांपैकी एकाने त्यांना पत्ता विचारला. त्या माहिती देत असताना त्यांच्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. सोनसाखळी हिसकावणाऱ्या तरुणांनी तोंडाला काळ्या रंगांचे मास्क लावले होते. एकाच्या पायात काळा तर दुसऱ्याच्या पायात पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट शूज होते. दोघांनी दाढी वाढविलेली होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सोनसाखळी हिसकावणारे दोघे एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर आले होते.