मध्य रेल्वेवर महिन्याभराचा ब्लॉक; कोकणकन्या, तुतारी, मांडवी अन् मत्स्यगंधा एक्सप्रेसचं वेळापत्रक कोलमडणार
esakal January 22, 2026 02:45 AM

Central railway Line Megablock: मध्य रेल्वेवर एक महिन्यासाठी पनवेल ते कळंबोली स्थानका दरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील लोकलसेवेला मोठा फटका बसणार आहे. फक्त लोकलसेवाच नाही तर एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही यामुळे परिणाम होणार आहे. कोकण रेल्वेवर धावणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलंय. यात तुतारी, मांडवी, कोकणकण्या, मत्स्यगंधा या चार प्रमुख एक्सप्रेसचा समावेश आहे.

पनवेल कळंबोली रेल्वे स्थानकादरम्यान ओपन वेब गर्डर उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प मालवाहतूक मार्गाचा भाग आहे. यासाठी रात्रीच्या वेळेत मेगा ब्लॉक असणार आहे. १८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत हा ब्लॉग लागू असेल. रात्रीच्या ब्लॉकमुळे लोकलसेवेवर फारसा परिणाम होणार नाहीय. पण १६ मेल एक्सप्रेस गाड्यांना उशीर होणार आहे.

महिन्याभरात मध्य रेल्वेवर सहा वेळा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे कोकणातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ब्लॉककाळात दौंड ग्वाल्हेर एक्सप्रेस पनवेल ऐवजी कर्जत-कल्याण-वसई मार्गे तर मंगळुरू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस काही काळ थांबवली जाणार आहे.

कोकणातून मुंबईत येणाऱ्या एक्सप्रेसलासुद्धा ब्लॉक काळात थांबवले जाईल. कोकणकण्या, तुतारी, मांडवी, मत्स्यगंधा या एक्सप्रेस ठिकठिकाणी थांबतील. यामुळे सीएसएमटीहून ७.१० ला सुटणारी मांडवी एक्सप्रेस ८.२० ला सुटेल. तर मडगावला एक तास उशिरा पोहोचेल. मध्य रेल्वेवर हे ब्लॉक आता २५ जानेवारी, ३ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी आणि १४ फेब्रुवारी असे सहा दिवस असणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.