रोहा-तांबडी रस्त्याची दुरवस्था
निवडणुकीपूर्वीच दुर्लक्ष; मतदारांचा संताप
रोहा, ता. २२ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तांबडी-बारशेत रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून हा संपूर्ण रस्ता खड्डे, सैल दगड आणि धुळीच्या साम्राज्यात बदलला आहे. सुमारे १० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर डांबरीकरणाचा नामोनिशाणही उरलेले नाही. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, कष्टकरी शेतकरी, कामगारवर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच लालपरीसह खासगी वाहनांतून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, रस्त्याची दुरवस्था इतकी गंभीर आहे की दैनंदिन प्रवास नाहक त्रासदायक ठरत असून, वाहनांचे नुकसान आणि अपघातांचा धोका वाढला आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाही या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची साधी मलमपट्टीसुद्धा करण्यात आलेली नाही.
या रस्त्यालगत तांबडी बुद्रुक, निवी ठाकरवाडी, सवाणे, बारशेत, गौळवाडी, म्हासाडी, वाली व कारिवणे ही गावे येतात. या सर्व गावांतील नागरिकांना रोहा बाजारपेठ, शासकीय कार्यालये, दवाखाने तसेच शिक्षणासाठी याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील अडीच ते तीन हजार मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्याचा थेट परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, तांबडी-बारशेत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो खड्डेमुक्त व सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्ग आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
चौकट
हनुमान टेकडी मार्गही धोकादायक
रोहा तालुक्याला तळा व मुरूड तालुक्यांशी जोडणारा हनुमान टेकडी मार्गे तांबडीकडे जाणारा रस्ताही अत्यंत खराब झाला आहे. पावसाळ्यात साईड पट्ट्या वाहून गेल्याने हा मार्ग अपघातप्रवण ठरला असून, येथे वारंवार अपघात घडत आहेत. पर्यटकांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते. या रस्त्याच्या दुरुस्तीची निविदा मंजूर झाली असून, आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय बागुल यांनी दिली.
कोट
राजकीय नेते निवडणुकीच्या काळात फक्त मतांची मागणी करण्यासाठी येतात; मात्र नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि रस्त्याची दयनीय अवस्था पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. रस्त्याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘रस्ता नसेल, तर मत नाही’ अशी ठाम भूमिका आता मतदार राजा घेणार आहे.
- जितेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते
फोटो कॅप्शन : रोहा तांबडी रस्त्याची झालेली दयनीय अवस्था