१२ तासांनंतर बिबट्या जेरबंद
दमणमधील इमारतीत वनविभागाची शोधमोहीम
कासा, ता. २२ (बातमीदार) ः केंद्रशासित प्रदेशातील दमणमधील एका इमारतीत अडकलेल्या बिबट्याला तब्बल बारा तासांनंतर जेरबंद करण्यात डहाणू वनविभागाच्या पथकाला यश आले. या मोहिमेत दमण वन विभागासह गुजरातमधील सुरत, बलसाड वन विभागाने सहभाग नोंदवला होता.
सोमवारी रात्री ११.३० सुमारास एका महिलेने इमारतीत बिबट्या पाहिल्याची माहिती वन विभागाला दिली. तळमजल्यावर मिठाईच्या दुकानातून तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वन, पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने तत्काळ मोहीम सुरू केली; मात्र मंगळवार दुपारपर्यंत इमारतीत लपलेला बिबट्या हाती येत नव्हता. अखेर बलसाड, सुरत वन विभागाची मदत घेण्यात आली. अखेर मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता दोन वन विभागाच्या वाहनांतून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सेलवास येथील लायन सफारी केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर तिसऱ्या मजल्यावर अडगळीच्या खोलीत बसलेल्या बिबट्याला जेरबंद करून सेलवास येथील लायन सफारी केंद्रात हलवण्यात आले आहे.
----------------------------
डहाणूचे उपवन संरक्षक यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी सहा सदस्यांचे पथक दमण नाईट मार्केटजवळील इमारतीत पोहोचले. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बिबट्याला रात्री ११.४५ वाजता सुरक्षितपणे खाली आणण्यात यश आले.
- हार्दिक सोनी, मानद वन्यजीव रक्षक, डहाणू