देशातील पहिल्या 'मेनोपॉज क्लिनिक'चा मान ठाण्याला
esakal January 23, 2026 05:45 AM

देशातील पहिल्या ‘मेनोपॉज क्लिनिक’चा मान ठाण्याला
महिलांसाठी सुरू झालेल्या क्लिनिकला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे शहर, ता. २२ (बातमीदार) ः देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ ठाणे जिल्ह्यात सुरू झाले आहे. मेनोपॉजच्या काळात महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण या क्लिनिकमध्ये करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्यात आले असून, ते राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिले क्लिनिक ठरले आहे.
मेनोपॉजच्या काळात महिलांना भेडसावणाऱ्या शारीरिक, मानसिक व भावनिक समस्यांवर एकाच ठिकाणी योग्य उपचार, तज्ज्ञ सल्ला उपलब्ध होणे गरजेचे असते. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शासनाने राज्यभरात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून झाली आहे. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमामुळे ठाणे जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील असलेल्या मेनोपॉज टप्प्याकडे आजवर सामाजिक आणि वैद्यकीय पातळीवर पुरेसे लक्ष दिले जात नव्हते. हॉर्मोनल बदल, मानसिक ताणतणाव, झोपेचे विकार, हाडांचे आजार, हृदयविकाराचा धोका, नैराश्य व चिडचिड यांसारख्या अनेक समस्या महिलांना या काळात सहन कराव्या लागतात. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा निर्णय महिलांच्या आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
..................
मेनोपॉज काय :
स्त्रियांच्या आयुष्यातील प्रजनन काळाचा शेवट होतो आणि मासिक पाळी कायमची थांबते. महिलांच्या आयुष्यात हा काळ साधारणपणे वयाच्या ४५ ते ५५ वर्षांत दरम्यान येतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, सलग १२ महिने पाळी न आल्यास मेनोपॉज झाल्याचे निदान केले जाते.
............................
कोट
ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मेनोपॉज क्लिनिक’ सुरू झाले आहे. या क्लिनिकमध्ये एकाच ठिकाणी महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी, आवश्यक औषधोपचार, आहार, व्यायाम व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
-डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
...............
मेनोपॉज हा आजार नसून महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. ठाणे जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक महिलेला योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा, यासाठीच मेनोपॉज क्लिनिकचा चांगला उपयोग होणार आहे.
-मेघना बोर्डीकर, आरोग्य राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.