पाबळ, ता. २२ : दुकानाचे कुलूप तोडून तब्बल तीन लाख रुपयांची रोकड, तसेच सीसीटीव्ही संच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पाबळ (ता. शिरूर) येथे घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाबळ येथे पांडुरंग लोखंडे यांचे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दुकान आहे. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. बुधवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता शटरचे कुलूप तुटलेले आढळून आले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता कार्यालयातील फर्निचरचे दरवाजेही फोडलेले दिसून आले. दरम्यान, टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली तीन लाख रुपयांची रोकड व सीसीटीव्ही संचही चोरट्यांनी चोरल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पांडुरंग दशरथ लोखंडे (वय ४४, रा. झोडकवाडी, पाबळ) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.