माजी नगरसेवक उमेश पाटील यांना स्वीकृत नगरसेवक करा
खारेगावातील शिवसैनिकांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
कळवा, ता. २२ (बातमीदार) : कळवा येथील प्रभाग क्रमांक ९ मधून सातत्याने मताधिक्याने निवडून येणारे खारेगावातील ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील यांची स्वीकृत सदस्य (नगरसेवक) म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खारेगाव परिसरातील शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
उमेश पाटील हे तीन वेळा कळवा प्रभाग क्रमांक ९ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले असून, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अत्यल्प मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यांच्या कार्यकाळात खारेगाव परिसरात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. खारेगाव येथील तलाव व उद्यानाचे सुशोभीकरण, पाणी व वीज प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलने, प्रशस्त रस्त्यांचे काम, खारेगाव फाटक बंद करून उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी महापालिका व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा व आंदोलने त्यांनी केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंडळाची स्थापना करून ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ सुरू करणे, दरवर्षी आरोग्य शिबिरांचे आयोजन, छत्रीवाटप, विविध क्रीडा स्पर्धा, गणेश मंडळांना मदत अशी सामाजिक व विकासात्मक कामे त्यांनी सातत्याने केली आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निष्ठा राखत उमेश पाटील यांनी आपल्या प्रभागात नव्याने शिवसेनेची नोंदणी करून संघटन मजबूत केले. मात्र, अलीकडील निवडणुकीत विकासकामे करूनही पराभव झाल्याने खारेगावातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. खारेगाव परिसरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने उमेश पाटील यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी स्थानिक शिवसैनिकांनी केली आहे.