बदलापूर बाललैंगिक अत्याचार
------------------------
बाल हक्क आयोगाकडून चौकशी
बदलापूर, ता. २३ (बातमीदार) ः शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या प्री-प्रायमरी शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
शुक्रवारी बाल हक्क आयोगाचे अधिकारी बदलापुरात दाखल झाले. या वेळी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी आणि संबंधित शाळा प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. निष्पाप चिमुकलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असताना, या प्रकाराची जबाबदारी स्वीकारण्यास शिक्षण विभाग तयार नसल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र, या घटनेची सर्व माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बाल हक्क आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांनी दिला आहे.
शिक्षण विभागाकडे माहिती नाही
संबंधित शाळा ही अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे नर्सरी प्ले ग्रुपसारख्या या प्री स्कूल शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यांच्या परवानग्या व त्यावर अंकुश कोणाचाच नसल्याने, अनधिकृत प्री स्कूलचे पेव शहरात फुटले आहे. ही घटना ज्या शाळेत घडली, त्या शाळेसंदर्भात शिक्षण विभागाकडे कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
अंबरनाथ तालुक्यातील शाळांची नोंद व माहिती जर इथल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे नसेल, तर अशा अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर यांनी दिला आहे. या घटनेमुळे अनधिकृत शाळा, स्कूल व्हॅन व्यवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे.