बांगलादेशनंतर आता पाकिस्तान टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून आऊट? पीसीबी अध्यक्ष नक्वी यांचं धक्कादायक विधान
GH News January 24, 2026 10:11 PM

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 7 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. बांगलादेशने भारतात सामने खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आयसीसीने त्यांच्या जागी स्कॉटलँड संघाला संधी दिली आहे. हा वाद निवळत नाही तोच आणखी एका वादाला फोडणी मिळाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी एक धक्कादयाक विधान केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. मोहसिन नक्वी यांनी सांगितलं की, पाकिस्तान या स्पर्धेत भाग घेणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्यांनी केलेलं विधान चर्चेत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अजूनही संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे संशय अजून वाढला आहे.

मोहसिन नक्वीने सांगितलं की, ‘पाकिस्तान संघाच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सहभागाबद्दल पाकिस्तान सरकार निर्णय घेईल. आम्ही पंतप्रधानांचं देशात परतण्याची वाट पाहात आहोत. बांग्लादेशसोबत अन्याय झाला आहे. जर पाकिस्तान सरकारने आम्हाला या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्यास सांगितला तर आयसीसी 22वा संघ सहभागी करू शकते. आम्हाला काहीच फरक पडणार नाही. मी आयसीसी बोर्डाच्या बैठकीतही हेच सांगितलं की, एका देशासाठी वेगळा नियम आणि दुसऱ्या देशासाठी वेगळा नियम चालणार नाही. बांगलादेशवर अन्याय करू शकत नाहीत. हा देशही एक महत्त्वाचा सदस्य आहे.’

आयसीसीने या स्पर्धेत आधीच एक बदल केला आहे. बांगलादेशची जागा स्कॉटलँड संघाने घेतली आहे. आता बांगलादेशच्या जागी वेळापत्रकात स्कॉटलँड हा संघ उतरेल. स्कॉटलँडचा संघ क गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ आणि इटली सोबत खेळेल. स्कॉटलँडचे सुरुवातीचे तीन सामने कोलकात्यात होतील. तर एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. आता पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून बाद झाला तर आयसीसीला आणखी एक संघ स्पर्धेत सहभागी करावा लागेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.