19476
आरती-भजनाचा नाद अन् भक्तिभावाचा प्रसाद
कुडाळात माघी गणेश जयंती; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ ः माघी गणेश जयंतीनिमित्त तालुक्यात गेले दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. तालुक्यातील विविध गणपती मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
शहरातील प्रसिद्ध पाटेश्वर, समादेवी, एस.टी. डेपो, कविलकट्टा येथील गणेश मंदिरांसह पिंगुळी शेटकरवाडी येथील जय गणेश मंदिराच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने काल (ता.२१) व आज गणेश पूजन, अभिषेक, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शेटकरवाडी येथे महापुरुष प्रासादिक भजन मंडळाचे सुश्राव्य भजन, स्थानिक मुलांचा रेकॉर्ड डान्स, तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला. आज पहाटे प्राकार शुद्धी, सकाळी सहा वाजता पूजाविधी, दुपारी बारा वाजता गणेश जन्मोत्सव महाआरती, दीड वाजता महाप्रसाद, हळदीकुंकू, महिलांच्या फुगड्या, हरिपाठ, भजन, श्रींची पालखी प्रदक्षिणा तसेच वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी. डेपो) गणपती मंदिरातही माघी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
---
शेकडो भाविकांना प्रसादाचा लाभ
शेकडो भाविकांनी पूजेचा व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. या ठिकाणी लहान मुलींनी सादर केलेले सुश्राव्य भजन हे उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. केवळ शहरातच नव्हे, तर तालुक्यातील ग्रामीण भागातील गणेश मंदिरांमध्येही माघी गणेश जयंतीनिमित्त अभिषेक, आरती, भजन, कीर्तन व महाप्रसाद असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिभावात पार पडले.