Mohammed Shami: रणजी ट्रॉफीत मोहम्मद शमीचा पंच, एकट्याने अर्धा संघ तंबूत पाठवला
GH News January 24, 2026 10:11 PM

रणजी ट्रॉफी 2025-26 एलीट ग्रुपमध्ये बंगाल आणि सर्व्हिसेज यांच्यात सामना सुरु आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून बंगाल विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. बंगालने प्रथम फलंदाजी करत 519 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना सर्व्हिसेजचा पहिला डाव फक्त 186 धावांवर आटोपला. त्यानंतर सर्व्हिसेजला फॉलोऑन दिला गेला. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 231 धावांवर 8 विकेट पडल्या. बंगालला विजयासाठी 2 विकेटची आणि सर्व्हिसेजला आघाडी मोडण्यासाठी 102 धावांची गरज आहे. सर्व्हिसेजची अशी स्थिती भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीमुळे झाली आहे. दुसऱ्या डावातील 8 पैकी 5 विकेट एकट्या मोहम्मद शमीने घेतले आहेत. दुसऱ्या डावात मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे सर्व्हिसेजचा संघ बॅकफूटवर गेला.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने 16 षटकं टाकली आणि 51 धावा देत पाच विकेट काढल्या. या दरम्यान त्याने तीन षटकं निर्धाव टाकली. मोहम्मद शमीने पहिल्या डावातही भेदक गोलंदाजी केली होती. पहिल्या डावात 16 षटकं टाकली होती आणि 37 धावा देत 2 गडी बाद केल्या आहेत. त्याच्या कामगिरीमुळे बंगालने पाच पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. आता चौथा सामन्यातही विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे ग्रुप सी मध्ये टॉपवर आहे. मोहम्मद शमी सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पण टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे.

मोहम्मद शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. पण असं असूनही त्याला संघात काही स्थान मिळत नाही. आता थेट ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या संघात निवड होईल की सांगणं आतातरी कठीण आहे. मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीत शेवटचा सामना खेळला होता. टीम इंडियासाठी 2023 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळालेलं नाही.

मोहम्मद शमीने भारतासाठी 64 कसोटी, 108 वनडे आणि 25 टी20 सामने खेळले आहेत. शमीने कसोटीत 229 विकेट, वनडेत 206 विकेट आणि टी20त 27 विकेट घेतल्या आहेत. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत त्याने एकूण 24 विकेट घेतल्या होत्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.