आमदार दौलत दरोडा यांचा शहापूर भात खरेदी घोटाळा प्रकरणातील आरोपी पुतण्या हरीश दरोडा याचा मृत्यू
esakal January 24, 2026 07:46 PM

हरीश दरोडा याचा मृत्यू
भातखरेदी घोटाळाप्रकरणी होता कारागृहात
शहापूर, ता. २३ (वार्ताहर) : आदिवासी विकास महामंडळाच्या भातखरेदी घोटाळाप्रकरणी अटकेतील हरीश उर्फ भाऊ दरोडा (वय ४६) याचा गुरुवारी (ता. २२) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अटकेनंतर त्याला कल्याणमधील आधारवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते.
शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचा हरीश उर्फ भाऊ दरोडा हा पुतण्या होता. सुमारे ४५ दिवस हरीश कारागृहात होता. २०२३ मध्ये तालुक्यातील साकडबाव केंद्रात दीड कोटींचा भातखरेदी गैरव्यवहार उघडकीस आला होता. याप्रकरणी साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष असलेल्या हरीश दरोडा, सचिव संजय पांढरे, केंद्रप्रमुख जयराम सोगीर, तसेच जव्हारचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, शहापूरचे तत्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड, तत्कालीन विपणन निरीक्षक समाधान नागरे यांनी शेतकऱ्यांच्या खोट्या व बोगस चलन पावत्या बनवून शासनाची व आदिवासी विकास महामंडळाची दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्यातील किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या भात घोटाळा प्रकरणात हरीश दरोडा हा दोन वर्षे फरार होता. त्याचा शोध सुरू असताना ९ डिसेंबर २०२५ ला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याची रवानगी कल्याण आधारवाडी कारागृहात केली होती. काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारींमुळे हरीश दरोडा याच्यावर अधूनमधून उपचार सुरू होते. गुरुवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.