आयपीएल 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी सर्वच फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर लगेचच आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. मिनी लिलावानंतर सर्वच संघांनी आपल्या संघांची पुनर्बांधणी केली आहे. असं असताना सर्वांचं लक्ष हे चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझीकडे लागून आहे. कारण महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा या फ्रेंचायझीकडून मैदानात उतरणार आहे. कदाचित महेंद्रसिंह धोनीसाठी ही आयपीएल स्पर्धा शेवटची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनीला खेळताना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महेंद्रसिंह धोनीनेही या स्पर्धेसाठी खास तयारी सुरू केली आहे. मागच्या पर्वात महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद भूषवलं होतं. ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानंतर त्याच्या खांद्यावर धुरा आली होती. पण या स्पर्धेत संघाची कामगिरी काही खास राहिली नव्हती. त्यामुळे या पर्वात खेळण्याबाबत साशंकता होती. पण चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यांनी या पर्वात धोनी खेळणार हे स्पष्ट केलं.
महेंद्रसिंह धोनीनेही सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम देत ही स्पर्धा खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आता झारखंड क्रिकेट संघाने सोशल मिडिया इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात रांचीच्या स्टेडियममध्ये सराव करताना दिसत आहे. यावेळी महेंद्रसिंह धोनी प्रॅक्टिस करताना दिसला. धोनीने फ्रेंचायझी सीएसकेचे पिवळ्या रंगाचे पॅड घातले होते. तसेच हातात नवी बॅट घेतली होती. यावेळी महेंद्रसिंह धोनीसोबत झारखंड क्रिकेटमधील त्याचा ज्यूनियर आणि टीम इंडियातील त्याचा साथीदार सौरभ तिवारी होता. सौरभ तिवारीही सराव करत होता. सौरभ तिवारी जेएससीएचा अधिकारी आहे.
धोनीचं शेवटचं पर्व?
View this post on Instagram
A post shared by Jharkhand State Cricket Association (@cricketjsca)
महेंद्रसिंह धोनीचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. या पर्वात महेंद्रसिंह धोनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडेल अशी अपेक्षा आहे. तसेच विकेटच्या मागेही त्याचा आक्रमक बाणा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. महेंद्रसिंह धोनीचं हे शेवटचं पर्व असेल की नाही हे काही आता सांगता येणार नाही. कारण हे पर्व संपल्यानंतर खरं काय ते समोर येईल. पण आयपीएल 2026 म्हणजेच 19व्या पर्वात खेळणार हे निश्चित आहे. आयपीएल स्पर्धा 26 मार्च ते 31 मे दरम्यान आहे.