सासवड, ता. २३ : सहकारमहर्षी स्व. चंदूकाका जगताप यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त सासवड (ता. पुरंदर) येथील संत सोपानकाका महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात भव्य भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. येत्या गुरुवार आणि शुक्रवारी (२९ व ३० जानेवारी) या स्पर्धा होणार असल्याची माहिती सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी दिली. सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षांपासून या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. यंदाही ही स्पर्धा ''खुला गट'' आणि ''लहान गट'' अशा दोन श्रेणींमध्ये पार पडणार आहे. पुरंदर-हवेली येथील भजनी मंडळांनी या स्पर्धेमध्ये आपली कला सादर करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्या संघांसह उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या गायक, हार्मोनियम आणि तबला-मृदंग वादकांनाही विशेष बक्षिसे देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक मंडळांनी बोपगाव भजनी मंडळ, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.