मुरूड-जंजिरा नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध
esakal January 25, 2026 10:45 AM

मुरूड-जंजिरा नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध
शिंदे गटाच्या शिवसेनेचे पाचही समित्यांवर निर्विवाद वर्चस्व
मुरूड, ता. २४ (बातमीदार) : मुरूड-जंजिरा नगर परिषदेतील सर्व विषय समित्यांच्या सभापती व सदस्यपदांची निवड बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)ने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगर परिषदेत शिवसेनेचे सर्वाधिक १२ नगरसेवक असल्याने सभागृहातील संख्याबळाच्या जोरावर पाचही विषय समित्यांवर शिवसेनेच्या नगरसेवकांची निवड झाली आहे.
नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सर्व विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे राजकीय चुरस न दिसता प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. शिवसेनेचे सर्व सभापती विविध विषय समित्यांवर नियुक्त करण्यात आले असून, यामुळे आगामी काळात नगरपालिकेच्या कारभारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा प्रभाव दिसणार आहे. तथापि, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा आराधना मंगेश दांडेकर या स्थायी समितीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत राहणार आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे. आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष वीरेंद्र दत्तात्रेय भगत यांची निवड झाली असून, या समितीचे सदस्य म्हणून अंकिता दीपेश गुरव, ॲड. रुपेश शंकर पाटील, आदेश हरिश्चंद्र दांडेकर आणि तमिम ढाकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बांधकाम व दिवाबत्ती समितीच्या सभापतिपदी यास्मिन जाहिद कादिरी यांची निवड झाली असून, सदस्य म्हणून ॲड. रुपेश शंकर पाटील, नितीन नामदेव आंबुर्ले, आदेश हरिश्चंद्र दांडेकर आणि मनोज हरिश्चंद्र भगत यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी पांडुरंग कृष्णा आरेकर यांची, तर नियोजन व पर्यटन विकास समितीच्या सभापतिपदी रुपेश रवींद्र रणदिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी नगमाना इम्तियाज खानजादे, उपसभापतिपदी सुगंधा पांडुरंग मकू, तर सदस्य म्हणून अंकिता दीपेश गुरव, देवायानी देवेंद्र गुरव आणि प्रांजली चेतन मकू यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी केली. या पाचही विषय समित्यांवर शिवसेना (शिंदे गट)चे निर्विवाद वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. नगरपालिका क्षेत्रतील विकासकामे, धोरणात्मक निर्णय आणि प्रशासनावर याचा थेट प्रभाव राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.