पौड, ता. २४ : इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत समुपदेशन करण्यासाठी, ताणतणाव दूर करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने (पीडीसीसी) स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांनी संस्थेतील समुपदेशकांकडून शंकाचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री, संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने स्वतंत्र मोफत हेल्पलाईन सुरू केली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा व्यवसाय मार्गदर्शन पदविका हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले संस्थेत चौदा समुपदेशक असतील. विद्यार्थ्यांच्या मनातील परिक्षेची भीती दूर करण्यासाठी, निकोप वातावरणात त्यांनी परीक्षा द्यावी यासाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी केले आहे. संगीता निंबाळकर, चंद्रशेखर वाघमारे, संतोष भोकरे, बंडू दातीर, संतोष रोकडे, योगेश जाधव, युवराज वणवे आदी समुपदेशक म्हणून काम पाहणार आहेत.