वृद्ध अंकलचे अश्लील चाळे, कमरेवर हात .. लाईव्ह कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
abp majha web team January 25, 2026 10:43 AM

Mauni Roy: टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आहे. हरियाणातील करनाल येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबाबत मौनीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

मौनी रॉयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सविस्तर नोट शेअर केली आहे. या नोटमध्ये तिने कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमधील काही व्यक्तींनी आपल्यासोबत अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप केला आहे.त्यात वृद्ध पुरुषांचाही समावेश असल्याचं सांगत, मौनीने लिहिलं की, “काल करनालमध्ये एक कार्यक्रम होता आणि तिथे उपस्थित काही पाहुण्यांच्या वागणुकीमुळे मी खूप अस्वस्थ झाले. विशेषतः दोन आजोबा होण्याच्या वयात असणाऱ्या पुरुषांमुळे."

‘कमरेवर हात ठेवला’

मौनीने सांगितलं की, स्टेजकडे जात असताना परिस्थिती अस्वस्थ करणारी झाली. “फोटो काढण्याच्या नावाखाली काही पुरुषांनी माझ्या कमरेवर हात ठेवला. मी तात्काळ त्यांना हात हटवण्यास सांगितलं, पण त्यांना ते आवडलं नाही,” असं तिने पोस्टमध्ये नमूद केलं.


स्टेजसमोर उभं राहून अश्लील इशारे

मौनीने सांगितलं, स्टेजवर गेल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. “दोन अंकल थेट समोर उभे राहून अश्लील चाळे करत होते, घाणेरड्या टिप्पण्या करत होते आणि माझं नाव घेऊन चिडवत होते. मी सुरुवातीला शांतपणे त्यांना थांबण्याचा इशारा केला, पण त्यानंतर त्यांनी माझ्यावर गुलाब फेकायला सुरुवात केली,” असं तिने सांगितलं.

थांबवण्याचा प्रयत्न केला असता शिवीगाळ

मौनीने पुढे लिहिलं की, परफॉर्मन्सदरम्यान एक क्षण असा आला की तिला स्टेज सोडून जाण्याची इच्छा झाली. मात्र तिने स्वतःला सावरत कार्यक्रम पूर्ण केला. “कोणत्याही आयोजकांनी किंवा कुटुंबीयांनी त्या व्यक्तींना थांबवलं नाही. स्टेज उंचावर असताना हे अंकल खाली उभे राहून व्हिडीओ शूट करत होते. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शिवीगाळ केली,” असा आरोप मौनीने केला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कारवाईची मागणी

या घटनेनंतर आपण हादरल्याचं सांगत मौनीने संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “आम्ही कलाकार आहोत आणि प्रामाणिकपणे मेहनत करून आपली उपजीविका करतो. त्यांच्या कुटुंबातील महिलांसोबत कोणी असं वागलं असतं तर त्यांनी ते सहन केलं असतं का? लाज वाटली पाहिजे,” असं ती म्हणाली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.