अमेरिकेनं आपल्या धोरणांमध्ये केलेल्या बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेमधील तणाव प्रचंड वाढला आहे. तसेच इराणमध्ये जो उठाव झाला, त्यामुळे मध्य पूर्वेत सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. इराणमधील वातावरण अस्थिर करण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप इराणकडून सातत्याने होत आहे, तर अमेरिकेकडून देखील इराणला सातत्याने हल्ल्याची धमकी देण्यात येत आहे. या सर्वांचा फायदा आता चीनने घेण्यास सुरुवात केली आहे. चीनने मोठा डाव खेळला आहे. चीनचे उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांची सोमवारी 57 देश सहभागी असलेल्या इस्लामिक सहकार्य संघटना OIC च्या महासचिवांसोबत बिजिंगमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली, मध्यपूर्वेत निर्माण झालेलं अस्थिर वातावरण आणि चीन व अमेरिकेमध्ये सुरू असलेला संघर्ष या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
चीनचं परराष्ट्र मंत्रालय आणि सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआ यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बैठक अशा वेळी झाली आहे, की सध्या मध्य पूर्वेमध्ये प्रचंड तणाव आहे. कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती आहे. तसेच इराणच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेला उघड -उघड इशारा दिलेला आहे की, इराणवर एक जरी हल्ला झाला तरी ते आमच्याविरोधात युद्धा सुरुवात झाली असं मानलं जाईल, या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीच्या एक दिवस आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं होतं. अमेरिका आपलं आणखी मोठ्या संख्येनं नौदल इराणच्या दिशेनं रवाना करणार आहे. तसेच इराणने पुन्हा अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करू नये, यासाठी देखील ट्रम्प यांच्याकडून इराणला इशारा देण्यात आला होता, दरम्यान त्यानंतर आता ही बैठक पार पडली आहे. त्यामुळे जर अमेरिकेनं इराणवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही क्षणी अमेरिकेवर देखील हल्ला होण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे.
दरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये मध्य पूर्वेत सध्या निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यात आली, मध्य पूर्वेतील प्रश्न हा युद्धानं न सोडवता शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावा, अशी चीनची भूमिका असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. तसेच विकसीत आणि विकसनशील राष्ट्राच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी चीन कायम पुढाकार घेईल असं म्हणत चीनने एक प्रकारे अमेरिकेला अप्रत्यक्ष इशाराच दिल्याचं बोललं जात आहे.