उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने राज्यातील जनतेला धक्का बसला आहे. अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडल्याने अनेकांना विश्वासच बसला नाही. पण दुर्दैवाने ही बातमी खरी ठरली. महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पीटीआयच्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांचं विमान कोसळलं. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व लोकांना मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीयच नाही तर क्रीडा जगतातही शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून अजिंक्य राहणेपर्यंत भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने खूपच दु:खद बातमी असल्याचं सांगितलं. त्याने त्याच्या सोशल मीडियावर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. “महाराष्ट्राने एक महान आणि कष्टाळू नेता गमावला आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझी संवेदना. ओम शांती.”, अशा भावान सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या.
सचिन तेंडुलकरसारख्याच भावना इतर क्रिकेटपटूंच्या देखील आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अजिंक्य रहाणने लिहिलं की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत.”
माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि लिहिले की, विमान अपघातात त्यांच्या निधनाची बातमी हृदयद्रावक होती. ते एक मेहनती नेते होते. युसूफ पठाण यांच्याप्रमाणेच तेलंगणा सरकारमधील विद्यमान मंत्री आणि भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनीही अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.