तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तब्बल साडेअठराशे महिला, तरुणी २०२५ मध्ये घर सोडून निघून गेल्या आहेत. दुसरीकडे तब्बल ३४२ अल्पवयीन मुलींचे देखील काहीतरी आमिष दाखवून अपहरण झाल्याचीही नोंद शहर-ग्रामीण पोलिसांत झाली आहे. पोलिसांनी अथक परिश्रम करुन ३०२ अल्पवयीन मुली शोधल्या आहेत. अजूनही ४० अल्पवयीन मुली व २८५ महिला, तरुणी पोलिसांना सापडलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विवाहापूर्वी व विवाहानंतर काही दिवस पती-पत्नी एकमेकांना या जन्मताच नव्हे तर सात जन्म तूच पत्नी किंवा तुम्हीच पती म्हणून हवे, अशा आणाभाका घेतात. पण, विवाहानंतर काही महिन्यातच सासरच्यांकडून कर्ज फेडायला माहेरुन पैसे आण, नवा व्यवसाय करायला, घर बांधायला, नवीन घर, गाडी घ्यायला पैसे आण म्हणून, विवाहातील मानपान, हुंड्यावरुन छळ सुरु होतो. विश्वासाच्या पती-पत्नीच्या नात्यात संशय निर्माण होऊन वादविवाद सुरु होतात.
सोशल मिडिया, मोबाईलचा अतिवापर त्याचे प्रमुख कारण मानले जाते. कुटुंबातील सततच्या त्रासाला कंटाळून महिला घर सोडून जातात. दुसरीकडे तरुणी, अल्पवयीन मुली प्रेमाच्या आमिषातून पळून जाण्याचेही प्रमाण लक्षणीय आहे. मोबाईल बंद करुन गेलेल्या महिला, तरुणी, अल्पवयीन मुलींच्या शोधासाठी पोलिस वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात आणि चिंतेतील आई-वडिलांना त्यांची इज्जत सुखरुप परत करतात. त्यासाठी पोलिस त्यांच्या कुटुंबाकडे देखील लक्ष देत नाहीत.
ग्रामीणमधील २०२५ मधील स्थिती
बेपत्ता अल्पवयीन मुली
२४३
न सापडलेल्या मुली
३७
महिला, तरुणी बेपत्ता
१,३१६
न सापडलेल्या मुली, महिला
२५०
-------------------------------------------------------------
सोलापूर शहरातील स्थिती
बेपत्ता अल्पवयीन मुली
९९
सापडलेल्या मुली
९६
महिला, तरुणी बेपत्ता
५३८
न सापडलेल्या महिला
७२
कौटुंबिक छळाला वैतागल्या विवाहिता
सोलापूर शहरात दरमहा सरासरी ७० महिला कौटुंबिक छळाला कंटाळून पोलिसांत धाव घेत आहेत. ग्रामीणमध्येही असेच प्रमाण आहे. २०२५ मध्ये सोलापूर शहर-जिल्ह्यातील सुमारे १६०० महिलांनी कौटुंबिक छळाविरुद्ध पोलिसांत तक्रारी नोंदविल्या आहेत. पती मद्यपान करुन त्रास देतो, सासरचे हुंडा, विवाहातील मानपानावरुन छळ करतात, मुलगाच पाहिजे म्हणून त्रास देतात, मोबाईल सतत वापरते म्हणून आणि चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ, मारहाण करतात, अशा महिलांच्या तक्रारी आहेत.
पालकांचा आपल्या मुलांसोबत हवा सुसंवाद
सोशल मिडियाचा अतिवापर, मित्रसंगत अन् पालकांचे दुर्लक्ष, मुले आणि पालकांमधील विसंवाद यातून अल्पवयीन मुले-मुली प्रेमाच्या आमिषातून पळून जातात, असे आढळते. पालकांनी मुलांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या वागण्यात काही बदल झालाय का हे पहायला हवे. मुलांसोबत सुसंवाद फार महत्त्वाचा आहे.
- धनंजय शिंगाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भरोसा सेल, सोलापूर शहर