मेन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्या जागी स्कॉटलँडला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, वुमन्स संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जागा पक्की केली आहे. सुपर सिक्स फेरीच्या एका सामन्यात बांगलादेशने थायलंडचा 39 धावांनी धुव्वा उडवला आणि स्पर्धेतील जागा निश्चित केली. हा सामना नेपाळच्या मुलपानी क्रिकेट मैदानात झाला. विशेष म्हणजे बांग्लादेश वुमन्स संघाने पात्रता फेरीत जबरदस्त खेळी केली. एकही सामना गमावला नाही आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट मिळवलं. पात्रता फेरीतील सात पैकी सात सामन्यात विजय मिळवला. ग्रुप स्टेजमधील चार सामन्यात आणि सुपर 6 फेरीत 3 सामन्यात विजय मिळवला.
थायलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बांगलादेशने 20 षटकात 8 गडी गमवून 165 धावा केल्या. सोभाना मोस्तारीने 42 चेंडूत 59 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 1 षटकार मारला. तर जुऐरिया फर्दौसने 45 चेंडूत 56 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे बांगलादेशला 165 धावांपर्यंत मजल मारता आली. या डावाच्या शेवटी रितु मोनीने 6 चेंडूत 15 धावा केल्या. या खेळीचंही कौतुक होत आहे. थायलंडकडून थिपाचा पुत्थावोंगने 4 षटकात 22 धावा देत 3 विकेट काढल्या. तर ओन्निचा कामचोम्फूने 2 विकेट, फन्नीता मायने 1 गडी बाद केला.
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 166 धावांचा पाठलाग करताना थायलंड 20 षटकात 8 गडी गमवून 126 धावा करू शकला. थायलंडच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. पहिल्याच चेंडूवर मरूफा अख्तरने विकेट काढली आणि थायलंडला दबावात आणला. त्यानंतर नत्थाकन चंथनने 46 धावा, नन्नापत कोंचरोएनकाईने 29 आणि नारूएोल चाईवाईन 30 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. मरूफा अख्तरने सर्वाधिक 3 विकेट काढल्या. रितु मोनी आणि शोर्ना अख्तरने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. फहिमा खातूनने 1 विकेट घेत विजयात योगदान दिलं. बांगलादेशचे सुपर 6 फेरीतील दोन सामने शिल्लक आहेत. पण त्या आधीच बांगलादेशचं टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं गणित सुटलं. वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित केली आहे