वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील 17 सामन्यांचा खेळ संपला आहे. साखळी फेरीत अजून 3 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. पण या तीन सामन्यात पुढचं गणित अवलंबून असणार आहे. आरसीबीचं गणित सुटलं आहे. पण इतर चार संघ शर्यतीत आहेत. यात गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स हे संघ आहेत. आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच बाद फेरीत जागा पक्की केली आहे. पण अजूनही अंतिम फेरीचं गणित काही सुटलेलं नाही. तर उर्वरित चार संघ बाद फेरीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात चुरशीची लढाई असणार आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे बाद फेरीत कोण जागा मिळणार याची उत्सुकता लागून आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सात पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबीच्या खात्यात 10 गुण असून नेट रनरेट हा +0.947 इतका आहे. आरसीबी बाद फेरीसाठी पात्र ठरली आहे. आरसीबीचा शेवटचा सामना युपी वॉरियर्सशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवताच आरसीबी थेट अंतिम फेरीत खेळणार आहे. पण पराभव झाल्यास गणित मात्र जर तर वर येणार आहे.
गुजरात जायंट्सने आतापर्यंत सात सामने खेळले आहे. त्यापैकी 4 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. गुजरात जायंट्सचे 8 गुण असून -0.271 नेट रनरेट आहे. गुजरात जायंट्सचा एक सामना शिल्लक आहे. हा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकताच गुजरात जायंट्स बाद फेरीचं गणित सुटणार आहे. पण पराभव झाला तर मात्र जर तर वर गणित असेल. हा सामना 30 जानेवारीला होणार आहे.
मुंबई इंडियन्स संघ सात पैकी तीन सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभूत झाला आहे. मुंबईच्या पारड्यात 6 गुण असून नेट रनरेट हा +0.146 आहे. मुंबईचा शेवटचा सामना गुजरात जायंट्सशी होणार आहे. हा सामना करो या मरोची लढाई असणार आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यात विजय मिळवला तर शर्यतीत राहिल. अन्यथा स्पर्धेतून आऊट होईल.
दिल्ली कॅपिटल्सची स्थिती मुंबई इंडियन्ससारखीच आहे. सात पैकी 3 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पदरातही 6 गुण आहेत. पण मुंबई इंडियन्सच्या तुलनेत नेट रनरेट कमी आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला नुसता विजय मिळवून नाही तर नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट हा -0.164 आहे. दिल्ली कॅपिटल्सचा शेवटचा सामना युपी वॉरियर्सशी होणार आहे.
यूपी वॉरियर्सने या स्पर्धेत आतापर्यंत फक्त 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. यूपी वॉरियर्सचे 4 गुण असून नेट रनरेट हा -0.769 आहे. पण यूपी वॉरियर्सचे दोन सामने शिल्लक आहे. दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर शर्यतीत येऊ शकते. यूपी वॉरिसर्सचे शेवटचे दोन सामने आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे.