-पांडुरंग म्हस्के
मुंबई: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार साहित्यामध्ये ‘गुलाबी’ रंग विशेषत्वाने वापरण्यास सुरुवात केली. गुलाबी रंग हा प्रेमाचा आणि आपुलकीचा असल्याने हा बदल केल्याचे पक्षाकडून सांगण्यात येते. विशेष म्हणजे अजित पवार यांनी स्वतःही गुलाबी रंगाची जॅकेट घालण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःसाठी तब्बल १८ जॅकेट शिवून घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी नियुक्त केलेल्या ‘डिझाइन बॉक्स्ड इनोव्हेशन्स’ या राजकीय डिजिटल प्रचार व्यवस्थापन कंपनीच्या सल्ल्यानुसार, पक्षाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये गुलाबी रंगाचा ठळक वापर केला. कार्यक्रमांचे बॅकड्रॉप्स व बॅनर्स, छापील व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिराती; तसेच पक्षाची सोशल मीडिया हँडलवरही गुलाबी रंग ठळकपणे दिसेल, अशी रचना करण्यात आली.
शासकीय; तसेच पक्षाच्या बैठकींमध्ये गुलाबी आणि किरमिझी रंगाचे जॅकेट घालण्यास सुरुवात केली. अनेकदा रंगावरून येणाऱ्या प्रतिक्रियांवर न चिडता त्यांनी विनोदी शैलींमध्ये उत्तरे दिली. पक्षाने सर्व मंत्री, आमदार-खासदारांना; तसेच जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांना सध्याच्या निळ्या-पांढऱ्या रंगसंगतीऐवजी गुलाबी रंग स्वीकारण्याचा सल्ला दिला होता.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातही त्यांनी मुली आणि महिलांसाठी विविध सवलती व योजना जाहीर केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, तरुणी व महिलांपर्यंत पक्षाचा संपर्क वाढवण्याचाही हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, गुलाबी रंग आणि महिलांशी वाढलेला संपर्क याचा पक्षाला फायदा मात्र निश्चितच झाला आणि पक्षाचे ४१ आमदार निवडून आले.