अजितदादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला; 'कामाचा माणूस' अनंतात विलीन, अवघा सह्याद्री हळहळला
जयदीप भगत, बारामती January 29, 2026 03:13 PM

Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात गेल्या साडे चार दशकांपासून झंझावात निर्माण केलेल्या, आपल्या रोखठोक शैलीने अनेकांना चकित करून सोडलेल्या, कामाचा माणूस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ठेवलेली प्रतिमा, ग्रामीण महाराष्ट्राशी जोडलेली नाळ, स्वत:साठी राजकीय विद्यापीठ करून घेताना दिलेला शब्द मोडायचा नाही, आपण कामाचा माणूस आहे हे तहहयात जपताना केलेला संघर्ष या आणि असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आज (29 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात एकच सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहे चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणरे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निपचित आहेत हे अनेकांसाठी काळीज कुरतडणारे होते. त्यामुळे अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला होता. चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते.

कुटुंबीयांकडून अजितदादांचे अत्यंदर्शन 

आज अजित पवार यांचे पार्थिव सकाळी काटेवाडीत ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या जमावाला अश्रु अनावर झाले. यावेळी झालेली अभूतपूर्व गर्दी पोलिसांना सुद्धा रोखणं अशक्य झालं होतं. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर जमाव नियंत्रित झाला. अजित पवार यांनी मुळगावी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या पार्थिवाचे पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या भगिनी तसेच सून यांनी अंत्यदर्शन घेतले. 

अजित पवारांना राजकीय दिग्गजांकडून श्रद्धांजली

अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून राजकीय नेते बारामतीमध्ये दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नबिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, छगन भुजबळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आंध्र प्रदेश सरकारमधील नारा लोकेश, गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोऱ्हे, अदिती तटकरे, पंकजा मुंडे, गणेश नाईक,  माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रफुल पटेल, रितेश देशमुख, मेधा कुलकर्णी, निवेदिता माने, अमोल कोल्हे, राजेश टोपे, सुरेश धस, संजय दिना पाटील, सचिन अहिर, मेघना बोर्डीकर, मकरंद पाटील, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, प्रकाश आबिटकर, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण वाहिली. 

पोलिसांकडून अजितदादांना मानवंदना 

अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्यात आल्यानंतर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांनी पार्थिवाला मंत्राग्नि दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी अजितदादा अमर रहेच्या गगनभेदी घोषणा देताच विद्या प्रतिष्ठानचा प्रत्येक कोपरा अन् कोपरा हळहळून गेला. 

शरद पवार यांच्यासमोर पार्थिव येताच सन्नाटा 

दरम्यान, अजित पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्काराठी जेव्हा विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आलं तेव्हा शरद पवार अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यासमोरील मंडपात विमनस्क आणि खोल गर्तेत बसून होते. राजकीय नेत्यांकडून त्यांचे सांत्वन केलं जात होतं. यावेळीच काटेवाडीहून अजित पवार यांचे पार्थिव समोर येताच शरद पवार अत्यंत शोकाकूल अवस्थेत आणि डोळे पाणावलेले झालेले दिसून येत होते. झिजत आलेल्या देहानं आणखी काय पाहायचं अशीच प्रतिक्रिया यावेळी अनेकांची दाटून आली. अजित पवारांच्या चेहरा सुद्धा शेवटच्या क्षणी पाहता आला नाही ही सल अनेकांच्या मनात कायम राहणार आहे. अजित पवार यांचे अत्यंदर्शन घेण्यासाठी पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना पार्थिवाजवळ सुप्रिया सुळे यांनी आणलं. यावेळी अजित पवारांच्या दोन्ही बहिण, सून यांनीही अंत्यदर्शन घेतलं. यावेळी पार्थ आणि जय यांच्यासह राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह रोहित आणि युगेंद्र पवार बाजूला उपस्थित होते. 

बारामतीमध्ये विमान अपघातात अकाली एक्झिट 

दरम्यान, बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा अपघातात मृत्यू झाला. अजित पवार मुंबईहून बारामतीला खासगी विमानाने प्रवास करत होते. हे विमान VT-SSK नोंदणी क्रमांक असलेले बॉम्बार्डियर लिअरजेट 45 मॉडेलचे होते. अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक अपघातात मृत्यूमुखी पडले. 

विमान धावपट्टीवरून घसरुन अपघात 

अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला जात होते. त्यांच्या आज चार ते पाच सभा होणार होत्या. ते सकाळी 8:10 वाजता मुंबईहून निघाले. वैमानिकाने बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने पायलटने विमान अधिक उंचीवर नेले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान, विमान धावपट्टीवरून घसरले आणि अपघात झाला आणि त्यात आग लागली. या आगीत पाचही जणांचा अंत झाला.

तीन दिवसांचा दुखवटा, उद्या अंत्यसंस्कार

अजित पवारांच्या निधनानंतर तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून सांत्वन केले. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह देशभरातील नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. 

महाराष्ट्राचे विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री 

22 जुलै 1959 रोजी आशा आणि अनंतराव पवार यांच्या पोटी जन्मलेले अजित पवार 1982 मध्ये राजकारणात आले. त्यांचे काका (त्यांच्या वडिलांचे धाकटे भाऊ) शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून, जेव्हा ते साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. महाराष्ट्राचे विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेले अजित पवार कधीही मुख्यमंत्री झाले नाहीत. जुलै 2023 मध्ये भाजप आणि शिवसेना युती सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी, त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, परंतु त्यांचे सरकार केवळ दोन दिवस टिकले. अजित पवार हे सध्याच्या सरकारमध्ये अर्थ आणि नियोजन मंत्री होते. पुढील महिन्यात 23 फेब्रुवारी रोजी मुंबईत राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असताना ते 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार होते.

साडे चार दशकांपासून राजकारणात 

अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र, त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली (प्रवरा) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते अखेरचा श्वास घेण्यापर्यंत ते राजकारणात सक्रिय राहिले. अजित पवार यांनी 1995 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.