टोकावडे, ता. २८ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. वाहने, विक्रेते आणि ग्राहकांच्या गर्दीमुळे सरळगाव नाका परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. मात्र, ही समस्या केवळ बाजाराच्या दिवसापुरतीच मर्यादित नसून, इतर दिवशीही वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत मनसेचे सरळगाव विभाग अध्यक्ष जय घुडे यांनी मुरबाडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करून तक्रार केली आहे. निवेदनात त्यांनी, सरळगाव नाक्यावर दररोज सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. या काळात अनेक वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असून, रस्त्यावर वाहने उभी करणे, चुकीच्या बाजूने चालवणे यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. यामुळे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दंडात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच बाजाराच्या दिवशी विशेषतः आणि इतर दिवशीही कोंडीच्या वेळेत वाहतूक पोलिस तैनात करावेत, योग्य वळण व्यवस्था राबवावी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. सरळगाव नाका हा मुरबाड तालुक्यातील एक महत्त्वाचा वाहतूक मार्ग असल्याने या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.