सोमेश्वरनगर, ता. २८ : बारामतीकरांच्या जे कल्पनेतही नव्हते ते आज सकाळी घडले. अजितदादा गेल्याची बातमी समजली आणि आभाळ कोसळले. घराघरात पोहोचलेले, तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारे, चुलीपर्यंत विकास पोहोचविणारे, प्रपंचाला हातभार लावणारा ‘दादा’ हृदयात होता. त्यामुळे आज त्यांच्या अपघाती मृत्यूने आपल्याच घरातला कर्ता पुरुष किंवा कुटुंबप्रमुख हरपल्याची भावना प्रत्येकाच्या ठायी होती.
सकाळी नऊलाच बारामतीकरांना अजितदादांच्या अपघाताची बातमी समजली. सुरवातीला काही काळ ते सुरक्षित असल्याची अफवा पसरली आणि लोकांना हायसे वाटले. मात्र पुढच्याच काही क्षणांत खरी बातमी कळाली आणि घराघरांना हुंदके फुटले. सुरवातीला कुणाचाच विश्वास बसला नाही. सांगणाऱ्यावरच लोक चिडून बोलत होते. मात्र हळूहळू लोकांची खात्री पटली.
सकाळी उघडलेली दुकाने, हॉटेल, मॉल्स, छोटे व्यावसायिक यांची शटर पुन्हा खाली झाले. अख्ख्या बारामती तालुक्यात चहाची टपरीसुद्धा उघडी नव्हती. यामुळे गावोगावचे चौक सुने झाले होते. एरवी प्रचंड गर्दीने वाहणारे बारामती शहर सुनसान स्मशानासारखे भासत होते. शाळांमध्ये गेलेले विद्यार्थी, शिक्षक डोळे पुसत पुसत दफ्तर पाठीवर टाकून पुन्हा घराकडे परतले. विद्या प्रतिष्ठान, शारदानगर, सोमेश्वर शिक्षण मंडळ, शिवनगर ही अजितदादांच्या कष्टाने बहरलेली शिक्षणसंकुलात मुलांचा आणि पाखरांचाही किलबिलाट थांबला होता. शिवनगरच्या क्रीडा स्पर्धा आज जाग्यावर थांबल्या. शहरातील अजितदादांच्या नजरेतून साकारलेली पंचायत समिती, नगरपालिकेचीही शटर ओढण्यात आली. अजितदादांनी उभारलेले सहकाराचे जाळे आज विस्कटल्यासारखे झाले होते. तर सोमेश्वर आणि माळेगाव कारखान्याच्या चिमण्यातून धूर नव्हे तर दुःखाचा उसासा टाकत असल्यासारखे वाटत होते. तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, बँका बंद झाल्या.
आता शनिवारी किंवा रविवारी होणारा जनता दरबार भरणार नाही, ओळखी माणसांचे कुठल्याही ओळखीशिवाय प्रश्न सुटणार नाहीत, गावोगावच्या सभांमध्ये अजितदादांची मिश्किली आणि भरदार आवाज ऐकायला मिळणार नाही, वांड नेतेमंडळींची झापाझापी होणार नाही अशा चर्चा लोक करत होते. चौकाचौकात धक्का बसलेले लोक एकमेकांमध्ये दुःख वाटून घेत होते. अजितदादांच्या दूरदृष्टीने रूंदावलेला नीरा-बारामती रस्ता, नीरा-मोरगाव आणि मोरगाव-बारामती रस्तासुद्धा आज सुनसान भासत होता.