शिराळा तालुक्याच्या राजकारणात आता प्रदीर्घ काळानंतर ‘ट्विस्ट’ आला आहे. दोन राष्ट्रवादीत विभागलेले नाईक आता एकत्र आले आहेत. प्रदीर्घ काळानंतर आमदारकी देशमुखांच्या घरातील पुढच्या पिढीचे नेते सत्यजित यांच्याकडे आली आहे.
महाडिक-देशमुख एकत्र आहेत. तालुक्याच्या पटाची मांडणी झाली आहे. मांगले-कांदे या शिराळ्याजवळच्या गावांत फिरताना या नव्या मांडणीचा आणि एकूण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा ज्वर उन्हाच्या तडाख्याबरोबर वाढताना दिसतो आहे.
Shirala Elections : नव्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतरणाचे नेत्यांचे प्रयोग; घरातील दुसऱ्या पिढीला सक्रिय करण्याचा नेत्यांनी केला निर्धारकांदे येथे स्नेह्याच्या कार्यासाठी गेलो होतो. जेवणाच्या पंगतीवरही राजकारणाची चर्चा चुकली नाही. वाढपीच वाढता-वाढता उमेदवाराचे गुण सांगत होता. कांदे फाट्यावर मांगले गटाचे उमेदवार प्रचारासाठी आल्याची माहिती पंगतीतच मिळाली. मोर्चा तिकडे वळवला.
रस्त्यावर खड्डे, पाणंद रस्ता असल्याने चिखल झालेला. त्यातूनच मार्ग काढत सपाटे वस्ती गाठली. तामजाई माळ परिसरातील डकरे, सपाटे, परीट वस्तीत उमेदवार प्रचार करीत होते. त्यातल्या एका वस्तीचं नाव पाचतळीनगर.
Shirala PS : विकासाची अपेक्षा, राजकीय तडजोडींची आगच महायुती-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चेत संभ्रम, कार्यकर्त्यांत चिंता वाढलीआडनावावरून शेतवस्तीची नावे असतात. हे नाव का, हे मात्र समजले नाही. माझी शंका वस्तीवरच्या दत्ता पाटलांनी दूर केली. म्हणाले, ‘‘पाच सर्व्हे नंबरची एकत्र हद्द म्हणून ‘पाचतळी.’’ पाचतळी वस्तीवर चारचाकी न्यायचे आजही शक्य नाही.
त्यामुळे उमेदवार-कार्यकर्ते पायवाटेने बांधा-बांधाने घराघरांत पोहोचले होते. वस्त्यांच्या विकासाचे आश्वासन देत होते. लोकही त्यांचे सुहास्य मुद्रेने स्वागत करीत होते. कांदे गावाच्या परिसरात अर्ज भरण्याआधीच प्रचाराने वेग घेतला होता. गट व गणाच्या उमेदवारांची आपापल्या पक्षाची चिन्हे पोहोचवण्यासाठी धावाधाव सुरू होती.
या भागात फिरताना जाणवले, ते मुख्य रस्ते झाले तरी अंतर्गत रस्त्यांची रड कायम आहे. अलीकडे बिबट्यांचा वावरामुळे ही गरज आणखी आवश्यक झाल्याचे जाणवले. सपाटे वस्तीवरील ७० वर्षांच्या नंदा सपाटे म्हणाल्या, ‘‘कोण उमेदवार हाय, हे माहीत न्हाय.
इळभर शेतातच असते. वस्तीपर्यंत पाण्याची सोय न्हाय. डोकीनंच पाणी आणाय लागतं. कंबर दुखतीय. घरकुलासाठी पाच वर्षे आर्ज केलाय. काम काय व्हत नाय.’’ वस्तीवरचे दिलीप सपाटेही यांनीही तीच री ओढली. ‘‘वस्तीला खासगी मोटरीचे पाणी घ्यावे लागते.
पावसाळ्यात रस्त्याची रड मोठी असते. मेलं तर मढं पिकअपने आणले,’’ असे त्यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी बिबट्याने सपाटेंच्या पाळीव कुत्रीचा फडशा पाडला. तिची पिल्लं पोरकी झाल्याचे त्यांनी सांगितले.
कापरी, सागाव, कणदूर गणांत काही प्रचारक महिला दिसल्या. मोजक्यात होत्या. बांबवडे व पाचुंब्री गावांत शांतता होती. गावात काही वेळ रेंगाळलो. मुलांनी आयऱ्या, विटी दांडूचा डाव मांडला होता. त्यांना मात्र या खेळातच रस दिसला. पाचुंब्रीत काही उमेदवार गावकऱ्यांशी बोलत होते. तिथेच काही वेळ थांबलो.
उत्तर भागातील पुसेसावळी ते वाकुर्डे बुद्रुक राज्यमार्ग या नव्या रस्त्यामुळे कासेगाव–शेडगेवाडी मार्गावर वाहतूक वाढून छोटे व्यवसाय दिसले. हा बदल अलीकडे जाणवलेला. पाडळी-पाडळेवाडी परिसरातून फिरताना बिबट्याची चर्चा होती.
गावात रोजगार मिळाला तर मुंबईकडे जायला लागणार नाही, असं लोकांशी बोलताना जाणवले. कोकरूड व पणुंब्रे-वारुण गटातील निवडणूक रणधुमाळी जाणवली. देशमुखांची पुढची पिढी रिंगणात आल्याची चर्चा होती. घराण्यांच्या परंपरांची सांगड दिसून आली.
चांदोलीकडे लोक फिरायला येत आहेत. मेणी खोऱ्यात वाकुर्डे योजनेचे पाणी व गुढे-पाचगणी पठारावर चांदोली धरणाचे पाणी मिळावं, ही मागणी ठळकपणे जाणवली. आता हे सारे प्रश्न जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत किती महत्त्वाचे, हा भाग वेगळा.