सांप्रतचे युग वेगाचे आहे. रेल्वे गाड्यांची गतीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बुलेट ट्रेनचा प्रारंभही लवकरच होणार आहे. अशा स्थितीत भारतात एक रेल्वे अशी आहे, की तिचा वेग तासाला अवघा नऊ किलोमीटर, म्हणजे माणसाच्या पळण्याच्या वेगापेक्षाही कमी आहे. या रेल्वेगाडीचे अंतरही खूपच लहान म्हणजे अवघे 45 किलोमीटर आहे. हे अंतर जाण्यास या रेल्वेला पाच तास लागतात. अर्थात, केवळ एवढ्यावरुन या रेल्वेसंबंधी आपले मत वाईट करुन घेणे चुकीचे ठरणार आहे. कारण या गाडीचा वेग मंद असला, तरी तिचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि आणि दिमाख खूपच मोठा आहे. या रेल्वेचे तंत्रज्ञानही अनोखे आणि वैशिष्ट्यापूर्ण असून यामुळे ते अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार म्हणून मानले जाते.
ही रेल्वे नीलगिरी पर्वतरांगांमधून धावते. तिचा अधिकतर वेग ताशी 12 ते 13 किलोमीटर आहे. ती ‘नीलगिरी माऊंटन ट्रेन’ या नावाने परिचित आहे. तिच्यात वैशिष्ट्यापूर्ण अशी रॅक अँड पिनियन व्यवस्था असून अशी व्यवस्था असणारी ती भारतातील एकमेव रेल्वे आहे. तिचा प्रारंभ स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांनी 1908 मध्ये केला होता. तेव्हा तिचा जो वेग होता, तोच आजही ठेवण्यात आला आहे.
ही रेल्वे मोठ्या चढणीही सहजगत्या चढू शकते. त्यामुळे तिचा वेग कमी आहे. डोंगराळ भागात चढउतार पुष्कळ असतात. अशा स्थानी नेहमीच्या रेल्वे धावू शकत नाहीत. कारण त्यांना प्रामुख्याने सपाट प्रदेश लागतो. ही रेल्वेसुद्धा सपाट प्रदेशात चालविली, तर तिचा वेग 30 किलोमीटर प्रति तास पर्यंत नेला जाऊ शकतो. या रेल्वेचा मार्ग अप्रतिम निसर्गसौंदर्याने भरलेला आहे. नीलगिरी पर्वतरांगांच्या निसर्ग सौंदर्याचे मनोज्ञ दर्शन या रेल्वेप्रवासात पर्यटकांना घडते. त्यामुळे वेग कमी असला तरी, पर्यटकांना कंटाळा येत नाही. किंबहुना, वेग कमी आहे, हे अवती-भोवतीच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना लक्षातही येत नाही, असा पर्यटकांचा अनुभव आहे. त्यामुळे या रेल्वेला प्रवासीही मोठ्या संख्येने आहेत.