अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरू, केंद्रीय संस्थेने सूत्र हाती घेतले, मुख्यमंत्र्यांना पत्र
अभिषेक मुठाळ January 29, 2026 06:43 PM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची (Ajit Pawar Baramati Plane Crash) चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून होणार आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानतंर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली. 

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय म्हटलंय? 

विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांनी तपास सुरु केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरु केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल.

या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ.

मुख्यमंत्र्यांची मागणी काय होती?

अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी 4 जणांना यात प्राण गमवावे लागले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. तसेच भविष्यात असे अपघात घडणार नाहीत, यादृष्टीने तातडीने पाऊले उचलण्यात यावी, अशीही पत्रातून मागणी केली होती.

अजित पवारांवर अंत्यसंस्कार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बारामतीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विमान अपघातात बारामती इथे अजित पवारांचा काल मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण राज्य दुःखात बुडालं. लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्येष्ठे नेते शरद पवार,  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षांतील ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती. अजितदादा अमर रहेच्या घोषणांमध्ये दादांना पार्थ पवार आणि जय पवार यांनी साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार केले. दादांच्या जाण्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं दिसतंय. 

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.