भोसरी, ता. २८ : भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर या परिसरांचा कायापालट दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात झाला. या परिसरात विविध प्रकल्पांचे काम मार्गी लावण्याचे काम अजित पवार यांच्या माध्यमातून झाले. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वात भोसरी परिसरात विविध समाजोपयोगी प्रकल्प उभे राहिले. यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला. विशेषतः भोसरी गावठाणातून जाणाऱ्या पीएमटी चौकात सततची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी अजित पवार पहाटेच उपस्थित राहिले आणि महापालिकेचे अधिकारी आणि पक्ष पदाधिकऱ्यांची झोप उडवली, असे किस्से आजही स्थानिक नेत्यांद्वारे सांगितले जातात.
पर्यटनाला चालना देण्यासाठी भोसरीतील लांडेवाडीतील शिवसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ भव्य पुतळा, रायगड दरवाजाची प्रतिकृती, ऐतिहासिक प्रवेशद्वार उभारण्याच्या कामासह वडमुखवाडीतील संत नामदेव व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीचे शिल्प आणि संतसृष्टी निर्माण करण्याचे काम अजित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आले. या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध उद्याने निर्माण करून सहल परिसरातील वातावरण ताजे ठेवण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखविली.
भोसरी गावचा पैलवानकीचा नावलौकीक पाहता गावजत्रा मैदानातील पै. मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राची उभारणी करत भोसरीचे नाव देशभर नेण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. भोसरीकरांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील खुर्च्यांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकाचे कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले. या परिसरात रस्त्यांचे जाळे विणले. आज हा परिसर पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरांशी रस्त्यांच्या माध्यमातून चारही दिशांनी जोडला गेला आहे. मोशीतील ट्रॅफीक पार्क, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मागासवर्गीय आणी आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह, आरटीओ कार्यालय, मोशी न्यायालय असे नावीन्यपूर्ण प्रकल्प या परिसरात अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून राबविण्यात आले.
दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली
भोसरी गावचे खऱ्या अर्थाने विकासाच्या माध्यमातून शहरीकरण करण्याचे काम माजी उपमुख्यमंत्री अत अजित पवार यांनी केले. कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी भोसरी परिसरात नेहमीच त्यांचा तळ असायचा. त्यांच्या जाण्याने भोसरीतील त्यांच्या समर्थकांचा आधार हरवला आहे. त्यांच्या निधनाची बातमी येताच भोसरी परिसरातील कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांच्या निधनाची बातमी येताच भोसरीतील आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पीएमटी चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता आदी भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
अजित पवार यांनी भोसरीचाच नाही, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाच्या माध्यमातून कायापालट केला. त्यांच्या अकाली जाण्याने धक्का बसला आहे. त्यांनी या निवडणुकीत शहराला २४ तास पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिले होते. शहराच्या विकासावर अजित पवार यांचे बारीक लक्ष असायचे. त्यांच्या माध्यमातून शहराचे पालक नेतृत्व हरपले आहे.
-विलास लांडे, माजी आमदार, भोसरी
अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने मी निशब्द झालो आहे. भोसरीसह पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांमुळे शहराचा नावलौकिक झाला आहे. सर्व महत्त्वाचे प्रकल्प राबवत अजित पवार यांनी भोसरीला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यानंतरही त्यांनी केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून त्यांच्या पाऊलखुणा भोसरी आणि शहर परिसरात नेहमीच त्यांची आठवण करून देत राहतील.
-अजित गव्हाणे, माजी नगरसेवक, माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस