लेकीची भरारी, घरी लग्नाची तयारी; विमान अपघाताने सगळच संपवलं, मनाला चटका लावणारा पायलट शांभवीचा मृत्यू
abp majha web team January 29, 2026 09:13 PM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह विमान दुर्घटनेत 5 जणांनी आपला जीव गमावला. या दु:खद घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त होत असून अवघा महाराष्ट्र डोळ्यात पाणी आणून रडत आहे. अजित पवारांच्या विमानाचे पायलट असलेल्या कॅप्टर कपूर आणि सहपायलट शांभवी पाठक यांचाही अपघाती मृत्यू झाला असून अवघे 25 वर्षे वयाची असलेल्या शांभवीचे फोटो काल सोशल मीडियात व्हायरल झाले. विमान सेवेतून उंच झेप घेण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या शांभवीच्या (Shambhavi) स्वप्नांचा विमान अपघातातच शेवट झाला. विशेष म्हणजे लेकीनं शिक्षण पूर्ण करुन, उत्तुंग करिअर घडवल्यामुळे आता तिच्या लग्नाची (marriage) लगबग पाठक कुटुंबात होती, दोन महिन्यांवर लग्न आलं असतानाचा काळाने असा क्रूर वार शांभवी आणि पाठक कुटुंबीयांवर केला. 

मार्चमध्ये लग्नाच्या तयारीत मग्न असलेलं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं. बारामतीजवळ झालेल्या अजित पवारांच्या विमान अपघातात को-पायलट शांभवी पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नव्या घराचे स्वप्न, अपूर्ण राहिलेला गृहप्रवेश आणि आयुष्याचे तुटलेले धागे या घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. हसतमुख, उत्साही शांभवीच्या जाण्याने प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत आहे. दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्हमधील नव्या घरात अजूनही सामानाच्या पेट्या उघडायच्या बाकी होत्या. चार–पाच दिवसांपूर्वी ज्या घरात आनंदाची चाहूल होती, तिथे आज शांतता आणि अश्रूंचं सावट आहे. प्रत्येक भिंत अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची साक्ष देत उभी आहे. शांभवीच्या अकाली जाण्याने कुटुंबच नव्हे तर ओळखीच्या प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. 

मार्चमध्ये ठरलं होतं लग्न

कुटुंबीय आणि मित्रांच्या माहितीनुसार शांभवीचं मार्चमध्ये लग्न ठरलं होतं. घरात लग्नाची चर्चा, तयारी, स्वप्नं सुरू होती. आई मुलीच्या भविष्यासाठी अनेक योजना आखत होती. पण लग्नाची तारीख येण्याआधीच अंतिम निरोप द्यावा लागला. शांभवीची आई एअरफोर्स बाल भारती शाळेत शिक्षिका असून या धक्क्यातून सावरू शकत नाहीत. राजधानी दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्हच्या ए-1 ब्लॉकमधील घर क्रमांक 313 मध्ये गृहप्रवेशाची तयारी सुरू होती. घर सजवण्याचे नियोजन, नव्या सुरुवातीचे स्वप्न — सगळं काही ठरलं होतं. पण, मुलीच्या मृत्यूच्या बातमीने सर्व काही थांबून गेलं. शेजाऱ्यांच्या मते, कुटुंब नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभं होतं. मात्र, आता तिथे सगळच बदललं आहे, तिथे शोककळा पसरली आहे.

नेहमी हसतमुख असलेली शांभवी

शेजारी, मित्र आणि परिचित सगळेच एकच सांगतात — शांभवी अत्यंत नम्र, आत्मविश्वासी आणि प्रेमळ स्वभावाची होती. नेहमी चेहऱ्यावर हास्य, प्रत्येकाला नमस्कार करण्याची सवय — तिच्या या आठवणींनी आजही सगळ्यांचे डोळे पाणावतात. तिचं हसू आणि तिची उर्जा परिसर कधीच विसरणार नाही. 

मुंबईत शिक्षण पूर्ण

शांभवीने 2020 ते 2022 या कालावधीत मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स, एव्हिएशन  एयरोस्पेस साइंस आणि टेक्नोलॉजी मध्ये बीएससी पदवी घेतली होती. तत्पूर्वी, 2018-2019 मध्ये न्यूझीलंड इंटरनॅशनल कर्मशिअल पायलट अकॅडमीतून शांभवीने 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स केला होता. तर, 2022 पासून VSR Venture प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फर्स्ट ऑफिसर पदावर ती कार्यरत होती. याच कंपनीच्या माध्यमातून त्या वैमानिक, पायलट म्हणून सेवा देत होती. शांभवीला एव्हिएशन सेक्युरिटी स्पाईसजेटकडून परवाना देण्यात आला होता, मार्च 2022 मध्ये हा परवाना इश्यू करण्यात आल्याची माहिती शांभवीने तिच्या लिंकड इन प्रोफाईलवरुन दिली आहे. तर, फेब्रुवारी 2022 मध्ये जेट ओरिएंटेशन ट्रेनिंगद्वारे A-320 विमानाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही शांभवीला देण्यात आले होते. दरम्यान, तिचे वडील सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे.  

शांभवीला 1500 तासांचा अनुभव 

दरम्यान, शांभवी पाठक हिचा 1500 तासांचा अनुभव असून कॅप्टन सुमित कपूर यांचा विमानसेवेतील अनुभव 16000 तासांचा आहे. सुमित यांनी सहारा जे एअरवेज आणि जेट लाईट्स कंपनीसोबत काम केलेलं आहे. 

Video: साहेबांना 'ते' गिफ्ट देण्याचं अजित दादांकडून राहून गेलं; अंकुश काकडेंनी सांगितला किस्सा भेटीचा, दोन राष्ट्रवादीच्या एकीचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.