उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं होतं? याबाबत आता माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटनं शेवटच्या क्षणी एटीसीला प्रतिसादच दिला नाही, असं नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं म्हटलं आहे, याबाबत नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे. अजित पवार यांच्या विमानाचं कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटव्हीमधून स्पष्ट झालं आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार अपघाताच्या शेवटच्या क्षणी पायलटने एटीसीला प्रतिसादच दिला नाही. विमानानं सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी बारामती विमानतळापासून 30 नॉटिकल मैलावर असताना बारामती एटीसी सोबत संपर्क साधला होता. बारामती एटीसी नं त्यांना व्हीएमसी कंडिशन म्हणजेच दृश्य हवामान परिस्थितीनुसार लँडिंग करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान त्यानंतर पायलटनं बारामती एटीसीला वाऱ्याचा वेग आणि दृश्यमानतेबद्दल विचारलं. त्यानंतर एटीसीने पायलटला वारं शांत असल्याचं आणि तीन हजार मीटरपर्यंत दृश्यमानता असल्याचं सांगितलं, त्यानंतर पायलटनं आपण लँडिंगसाठी तयार आहोत, मात्र रनवे दिसत नाही, असं सांगितलं. पायलटनं त्यानंतर लँडिंग रद्द करुन विमान पुन्हा हवेत नेलं. विमानानं विमानतळाजवळ एक घिरटी मारली, त्यानंतरही बारामती एटीसी आणि वैमानिकात संवाद सुरुच होता.
विमान घिरटी मारुन पुन्हा आल्यानंतर पायलटनं पुन्हा आपण लँडिंगसाठी तयार आहोत, मात्र रन वे दिसत नसल्याचं सांगितलं. रन वे दिसेन तेव्हा सांगेन असं पायलट म्हणाला. काही सेकंदानंतर पायलटनं रनवे दिसत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आठ वाजून 43 मिनिटांनी विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली. पण त्यानंतर पायलटनं एटीसीला कसलाही प्रतिसाद दिला नाही. सर्वसाधारणपणे एटीसी नं लँडिंगची परवानगी दिली तर पायलट समोरुन प्रतिसाद देतो. पायलटला संदेश समजाला आहे की नाही? हे तो एटीसीला सांगतो. पण अजितदादांच्या विमानाच्या पायलटनं एटीसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही, अन् त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हा अपघात झाल्याचं नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे.