मुलीचा जबडा काही केल्या बंद होईना, सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सनी हात टेकले, मात्र सरकारी डॉक्टरांनी असे वाचवले….
Tv9 Marathi January 30, 2026 04:45 AM

एका अल्पवयीन मुलीला विचित्र आजाराचा सामना करावा लागला होता. या मुलीचा जबडा खुला राहिल्याने तिच्या प्राणावर मोठे संकट उभे राहिले होते. अनेक देश विदेशातील डॉक्टरांकडे या आजारावर उत्तर नव्हते. या मुलीचा जबडा उघडा राहिल्याने तिच्या शरीरात इन्फेक्शनचा धोका निर्माण झाला होता. दातांची दिशा बदलली गेली होती. अनेक डॉक्टर उपाय करुन अक्षरश: थकले परंतू या विचित्र आजारावर उत्तर सापडत नव्हते. अखेर कोलकाताच्या सरकारी डॉक्टराने हा चमत्कार घडवला आणि या मुलीची त्रासातून सुटका करत तब्बल ९१२ दिवसानंतर तिला तोंड बंद करता आले आहे.

१० वर्षांच्या मुलीला एका असामान्य आजाराची लागण झाली होती. त्यामुळे तिच्या जबडा आणि चेहऱ्यांच्या स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांना नुकसान पोहचले होते. ज्यामुळे सुमारे ९१२ दिवस तिला तिचे तोंड बंद करता येत नव्हते.
राज्यातील डॉक्टर आणि बाहेरील अनेक रुग्णालयात उपचार करण्यात येऊनही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर कोलकाता येथील अहमद डेंटल कॉलेज आणि रुग्णालयात उपचार केल्यानंतर या चिमुरडीला तिचे तोंड बंद करता आले आहे.

हॉस्पिटलच्या एका ज्येष्ठ डॉक्टरने एका न्यूज चॅनलला सांगितले की, या मुलीला एक्यूट डिसेमिनेटेड एन्सेफेलोमायलायटिस ( ADEM ) हा दुर्धर आजार झाला होता. हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. या ऑटोईम्यून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून यात इम्युन सिस्टीम मेंदू आणि स्पायनल कॉर्डवर हल्ला करते.

दात खूप मागे हटले

प्रदीर्घ काळापर्यंत तोंड बंद न करता आल्याने या चिमुरडीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.या आजारामुळे तिचे तोंड कोरडे पडले. जबड्याचे संतुलन बिघडले आणि दात असामान्य पद्धतीने वरच्या दिशेने वाढू लागले. ज्यास सुप्रा-इरप्शन म्हटले जाते असे येथील डॉक्टरने सांगितले. ते पुढे म्हणाले की बराच काळ म्हणजे सुमारे वर्षांहून अधिक काळ तोंड उघडेच राहिल्याने दात त्याच्या सामान्य स्थितीपेक्षा खूप मागे हटले होते. ज्यामुळे इन्फेक्शन आणि कायम स्वरुपाचा धोका वाढला होता.

हाच एक पर्याय उरला

उपचाराची योजना तयार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये एक विशेष मेडिकल बोर्डची स्थापना करण्यात आली. विस्तृत तपासणीनंतर डॉक्टरांनी निष्कर्ष काढला की तोंड बंद करणे हे वैद्यकीय दृष्ट्या महत्वाचे होते. या मुलीवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले की या प्रकरणात जबडा बंद करण्यासाठी आणि पुढील अडचणींवर मात करण्यासाठी पाठचे दात काढणे हाच एक व्यवहारिक पर्याय उरला होता. अलिकडे या संदर्भात ऑपरेशन केल्यानंतर मुलीला खूपच आराम मिळाला आणि तिला तिचे तोंड बंद करता आले.

आता ही मुलगी तोंड बंद करु शकते

हा उपचार भविष्यात तिचे दात खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आणि तोंडाच्या इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी उपयोगी ठरला आहे. आता एक्यूट डिसेमिनेटेड एन्सेफेलोमायलायटिस (ADEM) हा दुर्धर आजारावरही उपचार सुरु करण्यात आला आहे. आता ही मुलगी तोंड बंद करु शकत असल्याने तिच्या प्राणावरचं संकट टळले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.