swt295.jpg
20665
मोरगाव ः येथील ज्ञानसाधना वाचनालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत. व्यासपिठावर उपस्थित इतर मान्यवर.
वाचनसंस्कृतीच विवेकी समाज घडवू शकते
सतीश लळीत ः मोरगाव-बौद्धवाडीत वाचनालयाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. २९ ः धर्माच्या नावावर केला जाणारा भेदभाव, जातीपाती, राजकारणातील हेवेदावे, जगण्याची स्पर्धा, सोशल मिडियाचा अतिवापर यामुळे दुरावलेला माणुस जोडण्याचे आणि विचारी, विवेकी माणुस घडवण्याचे काम फक्त वाचनसंस्कृतीच करु शकते, असे प्रतिपादन निवृत्त माहिती उपसंचालक व ''घुंगुरकाठी''चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केले.
मोरगाव-बौद्धवाडी (ता.दोडामार्ग) येथील समता कला क्रीडा मंडळाने सुरु केलेल्या ज्ञानसाधना वाचनालयाच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मोरगाव शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच संतोष आईर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार गोरड, सहायक शिक्षक संतोष गवस, केंद्रप्रमुख सुधीर जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. लळीत यांच्याहस्ते घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या सक्रीय सहभागातून हे वाचनालय सुरु करण्यात आले आहे. यावेळी श्री. लळीत म्हणाले, ‘‘आज संपर्कसाधने वाढली असली तरी माणुस दुरावला आहे. राजकारण असो की आणखी काही, प्रत्येक गोष्टीत धर्म आणि जात यांच्या भिंती नव्याने बांधण्याचे काम स्वार्थापायी होत आहे. त्यात मोबाईल आणि वॉटसॲपसारख्या सामाजिक माध्यमांमुळे मनुष्य एका चक्रात सापडून स्वप्रतिमेत अडकला आहे. प्रबोधनाची परंपरा खंडित झाली आहे. अशा विपरित परिस्थितीत पुस्तके आणि वाचनसंस्कृती विचारी आणि विवेकी माणुस घडवू शकेल. म्हणूनच वाचनालये मोठ्या प्रमाणात सुरु होऊन ती चालवली गेली पाहिजेत.’’
सरपंच आईर यांनी वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक करुन ग्रामपंचायतीतर्फे शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे सांगितले. मुख्याध्यापिका कुबल यांनी शिक्षणाचे जीवनातील महत्व सांगून हे वाचनालय ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असल्याचे प्रतिपादन केले. सहायक शिक्षक संतोष गवस, केंद्रप्रमुख सुधीर जोशी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार गोरड, सहायक शिक्षक स्वाती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या वाचनालयातील ग्रंथसंख्या ७५० आहे. या वाचनालयाला श्री. लळीत यांनी ८५ पुस्तके प्रदान केली. त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नातून अभिजित राजवाडे (अमेरिका) यांनी ४०, सावित्री जगदाळे (सातारा) यांनी १००, डॉ. आनंद जोशी (बोरिवली) यांनी १३, मंजुषा गाडगीळ (सोलापूर) यांनी ५० तर सुनीता कुलकर्णी (सोलापूर) यांनी ४१ अशी २४४ पुस्तके वाचनालयाला देण्यात आली. या ग्रंथदात्यांचे यावेळी आभार मानण्यात आले. यावेळी प्रमुख कार्यकर्ते प्रमोद पालयेकर, गोविंद कदम, मधुकर कदम, विकी कदम, भगवान कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन बाळकृष्ण कदम यांनी तर सूत्रसंचालन अमोल कदम यांनी केले. पांडुरंग कदम यांनी आभार मानले.