Delhi Crime News: उत्तर-पूर्व दिल्लीतील भजनपुरा परिसरात 6 वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 13, 14 आणि 15 वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे राजधानी दिल्लीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 जानेवारी रोजी घडली असून, त्याच दिवशी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिल्लीबाहेरील रहिवासी असून, ते भजनपुरा परिसरात एका फॅक्टरीत काम करत होते.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलीला खाण्याचे आमिष दाखवून आपल्या सोबत नेले. त्यानंतर तिला एका इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पीडित मुलगी गंभीर अवस्थेत घरी परतल्यानंतर कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आला. पीडितेला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी प्रकरण अधिक गंभीरतेने हाताळत तपास सुरू केला आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती पसरताच 24 जानेवारी रोजी भजनपुरा परिसरात नागरिकांनी संतप्त निदर्शने केली. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या